सीझन २ सुरू होण्यापूर्वी हुतात्मा पहा

64928228_649939798807717_2966049533824095172_nचक्क्यासारखं टांगून ठेवणे म्हणजे काय , किंवा इंग्रजीतील क्लिफ हँगर म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या मागच्या लेखातील हुतात्मा वेबसिरीज चा पहिला सिझन. अगदी खरं सांगायचं तर कथानकातील ज्या क्षणाला त्यांनी पहिला सिझन थांबवला आहे तो पाहून झाला की तुमची अक्षरशः चिडचिड होते. अरे ही काय जागा आहे का कथानक थांबवायची? पण नाही, प्रेक्षकांना चक्क्यासारखं टांगून ठेवायचं हा जणू चंगच बांधला होता. एक तर हा असा शेवट हाच मुळी सगळ्यात मोठा धक्का होता. आपण जो बघतोय तो सिझन १ आहे, याची शून्य कल्पना देऊन जो काय डाव टाकला होता तो इतका चपखल बसलाय की विचारता सोय नाही. मागे म्हटलं होतं, की जेव्हा ही सिरीज संपेल तेव्हा नंतर के बघायचं हा प्रश्न पडणार आहे, पण हा क्लिफ हँगर आला आणि तो प्रश्न, “काय बघायचं?” वरून, “याच्या पुढं काय?” यावर येऊन थांबला.

हुतात्मा सिझन २ चे प्रेरणादायक ट्रेलर पहा

पण सुदैवानं ZEE5 ने याच उत्तर वर्षभराची वाट न पाहायला लावता आत्ताच दिलं आहे. नुकताच “हुतात्मा सिझन २” ची झलक ZEE5 वर प्रदर्शित झाली आहे. आणि पहिल्या सिझन मध्ये जी काही उत्सुकता निर्माण झाली होती ती आता शिगेला पोहोचली आहे. सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, रवींद्र मंकणी, लोकेश गुप्ते ही पंचमहाभूते आपल्या मानगुटीवर बसण्यास पुन्हा एकदा तयार आहेत. अंजली पाटील साकारत आहेत ती नायिका विद्युत हिचे पात्र काही नवीनच वळणे घेत साऱ्या प्रेक्षकांना धक्के द्यायला सज्ज आहे.

मुंबई ईलाख्यामधून भाषिक प्रांतरचना करताना निर्माण झालेल्या स्वतंत्र भारतातील एका मोठ्ठया पेचातून ऊभी राहिलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ मोठ्या खुबीने पहिल्या सिझन मध्ये जयप्रद देसाईंनी उभी केली. पहिली ठिणगी पडली तेव्हापासूनचा सारा प्रवास पहिल्या सिझन मध्ये फार सुदंर रीतीने मांडला आहे. साऱ्या महाराष्ट्रात आपापले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले डावे, उजवे मतप्रवाह साकारणारी पंचमहाभूते जणू या साऱ्या घडामोडींना एका सूत्रात बांधणाऱ्या निवेदाकाचेच काम करत होते. दुसऱ्या सीझनची जी झलक आत्ता बघायला मिळते आहे त्यामध्येही सारीच महाभूते हे सूत्रधार निवेदकाचे काम करत राहतील असेच भासते आहे.

64875206_2778987032173072_736997064559168522_n
विद्युत सामंत (अंजली पाटील)

१९५६ साली फ्लोरा फाउंटनवर झालेल्या नरसंहाराच्या घटनेपासून सुरु झालेली ही वेबसिरीज पहिला सिझन संपता संपता येऊन पोहोचते ती प्रतापगडापाशी. १९५७ मध्ये यशवंतराव चव्हाणांच्या (क्षितीज झारपकर) पुढाकाराने प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण नेहरूंनी (आरिफ झकारिया) करावे असे ठरले. आणि याच घटनेच्या अवती भोवती, डावे, उजवे, मध्यम असे सारे मतप्रवाह आपली संयुक्त महाराष्ट्राची मागणी घेऊन पोहोचले आहेत. आणि काही तरी थरारक घटना घडणार त्याच नेमक्या क्षणी सिझन संपला आहे. आचार्य अत्रे (आनंद इंगळे), तसेच डाव्या विचारसरणीचे कॉम्रेड डांगे (मनोज कोल्हटकर), एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनात संयुक्त महाराष्ट्र समिती या चळवळीचे नेतृत्व करत होती, पण समाजातील सळसळणाऱ्या तरुण रक्ताच्या कामगार वर्गाची असलेली थोडी धारदार डावी बाजू उभी या मालिकेत अंत्यत दमदारपणे कॉम्रेड अभय सानेंच्या (वैभव तत्ववादी) सोबत उभी असलेली दाखवली आहे.

65272334_1250264355158571_1087635846770797825_n
श्रीरंग पत्की – पत्रकार (अभय महाजन)

या साऱ्या मतमतांतरांचे आपापसातले शह काटशह सुरू असतांनाच संयुक्त महाराष्ट्राच्या ध्येयावरची साऱ्यांची निष्ठा या साऱ्यातून जे चळवळीचे रसायन जमून आले आहे, ते हुतात्मा सिझन २ मध्ये फार प्रकर्षाने जाणवून येते. एखाद्या आगामी कलाकृतीची इतकी उत्तम झलक क्वचितच पाहायला मिळते. आणि हो, एक नवीन पात्र हुतात्मा सिझन २ मध्ये आपल्या भेटीला येत आहे जे अजूनही गुलदस्त्यातच आहे पण तो आवाज गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील नाटक, सिनेमा आणि दूरदर्शन मालिका यातून ऐकला आहे. पण मी कोणता आवाज म्हणतोय हे तुम्ही ट्रेलर पहिला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल. पण जर नसेल पहिला तर तुम्ही जर कोणी अजून ट्रेलर पहिला नसेल तर लवकर जरूर पहा. कारण १ जुलै पासून पुन्हा एकदा महाराष्ट्र जन्माच्या कहाणीचा पुढील सिझन आपल्याला पाहायला मिळणार आहे.

~~~~~

चित्र सौजन्य – ZEE5 premium


Discover more from Adi's Journal

Subscribe to get the latest posts sent to your email.


Comments

Leave a Reply