Adi's Journal

Pieces of my thourhgs

धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.

राखी, मग ती रेशमी असो, सोन्या-चांदीची असो, सुती असो की अगदी आजकाल येते तशी झगमग करणारी LED दिव्यांची असो; भावाबहिणीसाठी खूप पवित्र आणि ताकदवान बंधन आहे. धागा, ही ZEE5 ची फिल्म फिरते ती याच पवित्र बंधनावर. राज गुप्तांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालीला हा चित्रपट साहिल केणे आणि अश्विनी लाडेकर यांच्या उत्तम अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर पोचतो. गोष्टीचा भर या नात्याच्या आजूबाजूने फिरत असला तरी या चित्रपटात घडणारं महाराष्ट्राच्या खेड्यातलं जीवन अत्यंत खुबीने दाखवण्यात यश आले आहे.

4930286883_7be2623793_b

शंकर आणि उमा या भावंडांच्या नात्याला धरून पुढे जाणारा हा चित्रपट मराठी ग्रामीण जीवनाच्या अनेक अंगांना अगदी सहजपणे स्पर्श करत जातो. चित्रपट सुरु होतो तोच अगदी मराठी मातीत रुजेलेल्या आणि तुम्हा आम्हाला आपल्या लहानपणात घेऊन जाईल अशा गोट्या खेळण्याच्या सीननी आणि तिथून आपण शंकरच्या मागे मागे फिरत हा सिनेमा बघतो. भावाबहिणीच नातं उमलत जातं पण त्याच बरोबर उमाच्या मनात रुजलेल्या प्रेमाचं दर्शनही या कथेत घडत जातं. या उलगडत जाणाऱ्या नात्यांच्या पार्श्वभूमीवर वाजणारं संगीत नक्कीच मराठी मातीत रुतलेलं आहे.

रक्षाबंधनाच्या वेळेचं गाणं आणि त्या वेळेचं चित्रीकरण आपल्याला थेट ग्रामीण महाराष्ट्रात घेऊन जात. तिथलं छोट्या छोट्या सणांचं जे उत्साहाचं वातावरण असतं ते अगदी छोट्याशा सीन मधून अगदी छान दाखवल आहे. चित्रीकरणाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या समीर दांडेकर चं कौतुक करावे तितके कमीच आहे. पण याच चित्रीकरणाला सुस्मित लिमये आपल्या पार्श्वसंगीताने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

50121372_215464939396405_163418471662749537_n

वास्तविक हे भावाबहिणीचं नातं काही आपल्या चित्रपटसृष्टीला नवीन नाही. श्रेयस तळपदे आणि श्वेता प्रसादचा “इक्बाल” तसच संजय सुरी आणि जुही चावलाचा “माय ब्रदर निखील” याच नात्याच्या काही वेगळ्या छटा आपल्यासमोर घेऊन येतात. अगदी इतकंच कशाला, चित्रपटाचा मुख्य विषय नसला तरी “जाने तू या जाने न” मधून दिसणारं जेनेलिया डिसुझा आणि प्रतिक बब्बर यांच्यातलं भावाबहिणीच नातं मनातल्या काही विशेष तारा छेडून जातं.

अर्थात या नात्याचं महत्व म्हणा, किंवा आकर्षण म्हणा काय केवळ आपल्यालाच आहे असे नाही. आपल्याकडे जरी याला रक्षाबंधन आणि भाऊबीज असं धार्मिक महत्व असलं तरीसुद्धा साऱ्या जगाला या नात्यातलं प्रेम तितकंच प्रेमळ आणि महत्वाच वाटतं. असेच भावंडांच्या नातेसंबंधांचे वेगवेगळे पैलू अनेक इंग्रजी चित्रपटांमधून पण हाताळले गेले आहेतच. Her Name Is Sabine असेल, किंवा २००९ चा My Sister’s Keeper असेल, यातून सुद्धा भावंडांमधलं एक वेगळे नाते उलगडायचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलं गेला. अजूनही काही चित्रपट आहेत त्याबद्दल आपल्याला या पेजवर माहिती मिळू शकेल.

पण या साऱ्या सिनेमांपेक्षा धागा या नातेसंबंधाचा एक वेगळा पदर घेऊन आपल्यासमोर येतो. ग्रामीण महाराष्ट्रातील जनमानसावर असलेला रूढी, परंपरा यांचा पगडा किती घट्ट आहे याचाही संदर्भ या चित्रपटात अत्यंत खुबीने गोवला आहे. याबद्दल याचे कथा पटकथा लेखक शाद्वल यांचे विशेष आभार मानायला हवेत. आणि त्याच बरोबर मराठी भाषेचा खास ग्रामीण लहेजा पकडण्याचे काम संवाद लेखकांच्या टीमने अगदी चोख बजावले आहे. त्यामुळे कुठेही चित्रपटाची पकड प्रेक्षकांवरून सुटत नाही. डॉ. भाग्यश्री चिटणीसांनी साकारलेली आई तशी पडद्यावर अगदी दोन तीन शॉटपुरतीच आहे पण आई म्हणजे वात्सल्य हे ठसवून गेली आहे. शंकरची मित्रमंडळी आणि उमाचा मित्र सुद्धा आपल्याला अगदी सहज आपल्या आजूबाजूला सापडतील यात शंका नाही.

उमाच्या मनात रुजलेल्या प्रेमाचं काय होतं? वडिलांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शंकर आपल्या बहिणीची काळजी घेतो का? तिच्या पाठीशी उभा राहतो का? या साऱ्या प्रश्नांना या चित्रपटात अगदी छान आटोपशीर पद्धतीने हाताळले आहे. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्नांनी घर करणे सुरु केले आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी…

Related Posts

Leave a Reply