Your cart is currently empty!
चणे चटपटे!!!ऽऽऽ
संध्याकाळी दिवे लागणीची वेळ होऊ लागली की “चणे चटपटे!!!ऽऽऽ” अशी हाळी ऐकू यायची आणि पाठोपाठ ‘राधिकाची माय’ डोईवर पत्र्याचा डबा घेऊन आळीच्या कोपऱ्यावरून येताना दिसायची. संध्याकाळी धुडगूस घालून आम्ही पडवीत तिची वाट बघत बसायचो. पोटात कावळे कोकलत असायचे. राधिकाची माय घेऊन यायची ते चणे चटपटे हाच काय तो आम्हा पोराटोरांना दिलासा असायचा. आमच्यासाठीच्या पत्र्याच्या डब्याबरोबरच राधिकाची माय तिचा साऱ्या गावातून गोळा झालेल्या बातम्यांचा बटवा, धाकट्या सुनबाईजवळ म्हणजेच माझ्या आई जवळ उघडायची. चाण्यांवर लिंबू पिळता पिळता, चटपटीत बातम्यांची फोडणीपण एकीकडे सुरु असायची. तिची मळकी, ठिगळांची साडी, पिंजारलेले केस हा अवतार बघून पहिल्यांदा कोणीही घाबरलाच असता. “ती त्या पत्र्याच्या डब्यात घालून पोरं पळवते” असं सांगून तिने रोज यावं असा आमचा हट्ट होई लागला की आम्हाला दम दिला जायचा. याच भीतीपायी ते छान मसालेदार चणे तयार होईपर्यंत आम्ही आपले आईच्या पदराआड लपून बसलेले असायचो. आणि राधिकाची माय पण अनायसे बोलून जायची, “प्वोरं घाबरत्यात वाटतं मला…”
आजीला काही दानधर्म करायची इच्छा झाली आणि गरिबांत वाटायला १० घोंगड्या आणण्यात आल्या. अप्पांना बरोबर घेऊन १० घरी जाऊन ते वाटायच्या कामगिरीवर आमची देखील रवानगी झाली. त्या दहातल एक घर राधिकाच्या मायच पण होतं. आज त्यातलं बाकी विशेष काही आठवत नाही पण राधिकाच झोपडं मला पक्क आठवतंय. खोली म्हणता येईल का असा प्रश्न पडावा इतकं छोटंसं. आमच्याकडच्या ड्रायव्हर आणि माळ्यांची मोरी पण मोठी असेल. पण कमालीचं स्वच्छ. टापटीप! शेणानी लिंपून पोतेरं चढवलेली चूल, तांदळाच्या पिठीनी भिंतीवर चितारलेली चित्र, आणि भाजलेल्या चण्यांचा सुटलेला घमघमाट. एक फाटकी चादर अंगावर पांघरून ती खाटेवर पडली होती. अप्पांना पहिल्या पहिल्या राधिकाची माय डोक्यावर पदर ओढून सावरून बसली. अप्पांनी घोंगडं काढलं आणि तिच्या थरथरत्या हाती ठेवलं. काही क्षण विचार करून ती घोंगडं परत करू लागली. मोडकं तोडकं असलं तरी घर तिचं होतं. त्या झोपडीत ती मालकीण होती. पण अप्पांसमोर ती बोलणार तरी काय. त्यांच्या बोलण्याखातर तिने घोंगडं ठेऊन घेतलं. जाता जाता मी वळून पाहिलं तर दोन्ही हातात घोंगडं पकडून ती एक टक बघत बसली होती. हाती आलेलं हे घोंगडं बघून तिचा स्वाभिमान थोडा दुखावला गेला होता.
राधिकाची माय पुन्हा अळीच्या तोंडाशी दिसली नाही न कधी तिची “चणे चटपटे!!!ऽऽऽ” अशी हाळी ऐकू आली. गरीब भिकाऱ्यांना इतका कसला माज? आजीचा संताप झाला होता. असो, कोपऱ्यावरच्या वाण्याकडून आणलेला वडापाव खायची आता आम्हाला सुद्धा सवय झाली होती. पण अर्थात त्याला राधिकाच्या मायची खास खबरांची फोडणी थोडीच असायची. एक दिवस अचानक, म्हातारी अंथरुणाला खिळली आहे सांगायला राधिका रडत रडत घरी आली. एकदा शेवटच म्हातारीला भेटाव अशी प्रबल इच्छा आमच्या आईला झाली आणि मला आणि दादाला हाताशी घेऊन आई तिच्या झोपडीकडे चालू लागली. हुडहुडी भरवणारी थंडी पडली होती. झोपडीत आता न चणे होते, न म्हतारीत काही जोर उरला होता. चुलीची उबही कुठे जाणवत नव्हती.
राधिकाची माय आता शेवटच्या घटका मोजत होती. मी राधिकाचा हात पकडून उभी होते आणि आई तिच्या आईचा. हृदयाचे ठोके अधिकच जोरात पडत होते. राधिकाच्या मायने थरथरत्या हाताने कोपऱ्याकडे इशारा केलं. कोपऱ्यात एक पत्र्याचा डबा पडला होतं. मी तो घेऊन तिच्यापाशी आले. तिनी तो थरथरता हात माझ्या केसांतून फिरवला आणि कापत्या आवाजात म्हणाली, “तुह्यासाटीच हाये हो बाळ. घे. मला घाबरू नगस” तिनी कायमचे डोळे मिटण्याआधीच मला दादाबरोबर आईनी परत पाठवून दिले. घरी येऊन डबा उघडून बघावा तर तो गरम चटपट्या चण्यांनी काठोकाठ भरला होता. राधिकाच्या माय अशाप्रकारे आमच्या उपकरातून उतराई झाली होती. तिचा तो स्वाभिमान आठवला की आजपण मला अंगावर काटा येतो.
मोटारगाड्या, मोठ घर, आणि इतर सोविधांच्या रुपात घरी झुलणाऱ्या श्रीमंतीत आजपण दिवेलागणीची वेळ झाली की हवेत तोच मसालेदार वास दरवळतो आणि दूर कुठूनशी हाळी येते…
“चणे चटपटे!!!ऽऽऽ”
—
अनुवाद – आदित्य साठे
मूळ कथा – अंकिता सिंह
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.
Comments
One response to “चणे चटपटे!!!ऽऽऽ”
Khoopach chaan!
Leave a Reply