Category: कविता

  • धार

    शब्दांची ती धार कधीही
    चालवणाऱ्या कळतच नाही
    झेलाणाऱ्याच्या हृदयावारल्या
    जखमा त्याला दिसत नाही.

    जखमेवरती फुंकर सोडा,
    पुनःपुन्हा ते वारच होती.
    नाजुकशा वेड्या मनाची,
    क्षणात एका शकले होती.

    विखुरलेली ती शकले सारी,
    गोळा करता नवीन घाव.
    कसे तुला रे कळतच नाही,
    झेलू कुठे हे नवीन घाव.

  • चोर चार

    एकदा झाला चमत्कार
    स्वप्नात आले चोर चार

    म्हटले काढून मोठ्ठा सुरा
    असेल ते सारे देऊन टाक पोरा

    घाबरत त्यांना मी आत गेलो
    थांबा, असेल ते घेऊन आलो

    पळत पळत आत गेलो
    रद्दीची पिशवी घेऊन आलो.

    रद्दी बघून ते जास्तच चिडले
    मारायला मला पटकन धावले

    म्हणालो, काका जरा थांबा
    काय म्हणतो, ते तरी ऐका

    उशिरा येऊन बघा केला घोटाळा
    सारं लुटून गब्बर आत्ताच गेला.

    जमला तर एक काम करा
    रद्दी तेवढी विकून टाका

    आईला रद्दी दिसली जरी
    राग येईल तिला भारी

    मला आई खूपच ओरडेल
    तुम्हाला तर चोपुनच काढेल

    मार खायची असेल तयारी
    येईलच थांबा तिची स्वारी.

    चोप म्हणताच ते भ्याले फार
    पळून गेले चारच्या चार….

  • गर्भित भाव

    कधीही कळले नाहीत तुजला,
    शब्दांमधले गर्भित भाव.
    माझ्या हरेक श्वासामधूनी,
    दडले आहे तुझेच नाव.

  • वाट

    आयुष्याच्या वाटेवर चालताना
    कुठलंसं वळण येतं
    मागचं सारं मागे सोडत
    नवीन जग समोर येतं….

  • शपथ

    सये नको तू जाऊस
    खेळ मांडला सोडून,
    तुझ्याविना माझा पहा
    श्वास राहतो आडून.

    अशी उठतेस जेव्हा
    खेळ अर्धा टाकून,
    जणू वाटते हा जातो
    जीव शरीर सोडून.

    सखे शपथ ही तुला
    नको जाऊस उठून,
    कोण मांडेल हा डाव
    जर गेलीस मोडून..

  • प्रतिबिंब

    दुसऱ्याला दाखवताना
    कधी त्यालाही वाटते,
    माझेही प्रतिबिंब
    कुणी मला दाखवावे.