Author: Adi Sathe

  • पाणी : निसर्गाची अमूल्य देणगी…..

    आज बऱ्याच दिवसांनी काही लिहिण्याची इच्छा झाली, आत्ताच फेसबुक वर एक चित्रफित बघितली. सध्याच्या म्हणजे दर उन्हाळ्यात सगळी कडे भेडसावाणाऱ्या पाण्याच्या समस्ये बाबत असलेली ती चित्रफित बघून अक्षरशः मन विचारप्रवृत्त झालं आणि सरळ कागद समोर ओढून हे शब्द उतरवू लागलोय. पाणी; निसर्गाची मानवाला मिळालेली एक अमूल्य देणगी. पाणी म्हटलं कि समोर येते ती खळखळत वाहणारी नदी, अथवा डोंगराच्या कुशीतून नितळ पाणी घेऊन येणारा अवखळ झरा, आणि लांब लांब पसरलेला अथांग समुद्र. या पैकी सध्या आपण पिण्या योग्य पाण्याचाच विचार करावा. खर तर निसर्गानी भरभरून दिलेली ही देणगी आपण स्वतःच्या हातांनी उधळून उधळून पार संपवून टाकली आहे. म्हणून तर आज आपल्याला दुष्काळाच्या इतक्या भयानक परिस्थितीला तोंड द्यावा लागतं आहे. आजकाल तर हा प्रश्न इतका भयानक झाला आहे की जानेवारी फेब्रुवारीतच पाणी टंचाईची लक्षणं दिसू लागतात. विहिरी तळ गाठतात, नाले कोरडे पडतात, नदीपात्रातील वाळू दिसू लागते. आणि एक भयानक चिंता भेडसावू लागते, पाऊस पडेपर्यंत पाणी कसे पुरणार. मग सगळी जनता सरकारकडे नजरा लावून बसते जणू सरकार पाऊसच पडणार आहे. जर पाणीच नाहीये ते लोक तरी काय करणार, त्यांच्या हातात पण एकाच उपाय शिल्लक असतो – पाणीकपात. मग सुरुवातीला आठवड्यातून एकदा असलेली पाणीकपात तापत्या उन्हाबरोबर वाढत जाते आणि एक दिवसाआड पाणी मिळणं सुरु होतं. या वेळापर्यंत माध्यमांमधून मधे मधे पाणी टंचाई बद्दल अनेकानेक लेख आलेले असतात, बऱ्याच चार्चासत्रांची नोंद झालेली असते. सगळेच जण म्हणत असतात की या वेळी पाणी टंचाई आहे. पुढल्या वर्षी पाऊस झाल्यावर पाण्याचे नीट नियोजन करून परत अशी टंचाई येणार नाही अशी सोय करू. पण पुढल्या वर्षीही हिच परिस्थिती परत हजेरी लावणार.

    इतकं सगळं झाला तरीपण शहरी भागात फारसा फरक पडत नाही. पण खेड्या पाड्यात मात्र फेब्रुवारीतच वणवण सुरु होते. कित्येक किलोमीटर लांब जाऊन डोक्यावर हंड्या कळश्या एकावर एक रचून बायका अनवाणी पाणी आणत असतानाचे चित्र उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच दिसू लागते. कित्त्येक गावांना बाहेरून वाहनांमधून पाणी पुरवावे लागते. या सगळ्याला मे पर्यंत तर इतकी मागणी येते की गावांना पाठवायला वाहनं कमी पडतात. मग फक्त पाण्यावरून मारामाऱ्याच होणे बाकी असते. कधी कधी तर अशी वेळ येते की सगळे गावच्या गाव ओस पडते पाणी नाही म्हणून. पाणी नाही म्हणून अन्न पण नाही. जनावरांना चारा नाही. कधी कधी अन्न पाण्याशिवाय मृत्यू आलेल्या जनावरांचे आकडे येतात, एखादा फोटो असतो. ते पाहिलं, वाचालं की काळीज तेवढ्यापुरतं हेलावतं आणि आपण पान उलटून पुढे जातो.

    ह्या सगळ्या हलाखीच्या परिस्थितीतही अनेकानेक नवीन अम्युझमेंट पार्क्स निघत आहेत ज्यात अनेक ठिकाणी भरमसाठ पाणी वापरलं जातंय. नवनवीन मोठे मोठे स्नो वल्ड निघतात ज्यात खंडीभर बर्फ बनवून वापरला जातोय तो फक्त शहरातील काही निवडक वर्गासाठी जो या सगळ्या गोष्टींसाठी पैसा देऊ शकतो. वर उल्लेख केलेल्या चित्रफितीमध्ये अशाच एका ठिकाणी काही लोकांना विचारला तर त्यांचा सूर असाच होतं की आम्हाला अशा परिस्थितीची जाणीवही नाहीये, आणि “पाणी वाचवा” सारख्या गोष्टी फक्त टेलिव्हिजन वरच चांगल्या दिसतात. त्यानुसार वागणं अशक्य आहे. माझे स्वतःचे वैयक्तिक मत पण असे नाहीये की या सगळ्या गोष्टी बंद करा. त्या असू देत पण त्या सगळ्याचा आनंद घेताना किमान हे भान तर ठेवा की आपल्याच देशात अशी परिस्थिती सुद्धा आहे.

    पाणी जिरवण्यासाठी आणि जमिनीतील पाणी वाढवण्यासाठी आपल्या शहरी लोकांकडे एक छान उपाय आहे. घरावर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करून ते जमिनीत जिरवणे, अथवा साठवणे. सगळी रचन तयार करण्यात थोडा पैसा खर्च होईल पण ते कारण आता आवश्यक बाब झाली आहे. नवीन इमारतींना तर त्याशिवाय परवानगीच मिळत नाही. पण जुन्या इमारतींनी पण ही रचन करून घेणे खूप योग्य आहे. किमान आपल्या स्वतःच्या घराच्या पाण्याची तर सोय होईल, असा विचार करून जरी हा पैसा खर्च केला तरी धरणांमधील पाणी वाचेल आणि ते इथर ठिकाणी पोहोचवता येईल. हा एक उत्तम उपाय सध्या प्रचलित होतोय. याचा जास्तीत जास्त प्रसार आणि वापर कारण आता काळाची गरज आहे असा म्हटलं तरी वावगे ठरणार नाही कारण असा काही जिवावरचा संकट आल्याशिवाय आपण काही करत नाही. शिवाय जर शक्य असेल तर ज्या जलसंवर्धन योजना बिगरसरकारी संस्थांतर्फे राबवल्या जातात त्यात सहभागी व्हा, त्यांना अर्थ साहाय्य द्या.

    इतकाच काय, आपण आपल्या लहान लहान कृतींमधून पण बरेच पाणी वाचवू शकतो. या कृती अक्षरशः इतक्या लहान सहन आहेत की आपल्या लक्षात पण येत नाही की आपण या सगळ्यात पाणी वाया घालवतोय. उदाहरणार्थ गाडी धुणे, गाडी धुतांना सामान्यतः आपण नळी लावून धुतो पण त्याच ऐवजी एखाद्या बादलीत पाणी घेऊन फडक्यांनी व्यवस्थित पुसले तर एक बादलीभर पाण्यात नक्कीच गाडी झकास चमकून निघेल. तसेच अंघोळ करताना शोवरनी करण्या ऐवजी बादलिनी करावी. जेणेकरून आवश्यक तितकेच पाणी वापरले जाईल. दात घासताना, दाढी करताना कित्येक लोकांना नळ चालू ठेवण्याची सवय असते. ते टाळले पाहिजे. शिवाय सगळ्यात पहिली गोष्ट तर घरातले गळके नळ लगेच दुरुस्त केले पाहिजेत अथवा बदलावेत. कुठे पाणी वाहत असेल तर बंद करावे. शेजारी जर पाण्याची टाकी वाहत असेल तर किमान त्यांना सांगावे की टाकी भरली आहे बंद करा. अर्थात ऐकणे न ऐकणे त्यांचे काम. पण आपण निदान सांगावे तरी. या सगळ्या सध्या सध्या गोष्टींवर जरी लक्ष दिलं गेलं तरी खूप पाणी वाचेल.

    मित्रांनो, प्रत्येक समस्येकडे सरकारकडे बघत बसण्यापेक्षा आपण स्वतः काम केले, आपल्या जीवनशैलीत बदल केले तर असे बरेच प्रश्न आपले आपणच सोडवू शकू बरोबर की नाही???

  • विरह सर

    सर पावसाची लागे, मन विरहात बुडे….
    बघ आला हा श्रावण, कुठे दिसे ना साजण…

    वाटी डोळे हे लावून, सारे दिन हे सरले..
    विरहाच्या सोबतीत, ह्या रात्रीही सरल्या….

    विसरला का रे, तू वाट या घरची…
    नको वाट तू बघू रे श्रावण सारण्याची…

  • मनाचा प्रवास….

    वाहत जात मन विचारांच्या प्रवाहात…
    हळूच कधी मागे येतं प्रवाहाच्या विरोधात…
    गुंतत बुडत विचारात, जात राहतं दूरवर …
    मधेच हात मारून मागे येतं जेव्हा येतं भानावर…

  • हवंय काय या मनाला????

    खरच कळत नाही मला हवंय काय या मनाला…..
    क्षणात खोल सागरी तर क्षणात गवसणी गगनाला..

    पंख पसरून उडतंय कधी उंच उंच आभाळी…
    कधी कटलेल्या पतंगाबरोबर खाते गटांगळी….

    असते कधी शूर वीर बाजीराव रणीचा….
    तर कधी बनते दासही कोण्या दासाचा….

    काय हवाय ते कळतंय का मनाचा तरी मनाला..
    का विचारताय ते उगीच आपला याला त्याला????

  • पाणीकपात

    माणूस कायमच होता, खूप पाणी या भ्रमात,
    उडाली झोप त्याची, जेव्हा सगळी धरणं गेली तळात.

    काय करावा उपाय म्हणून बसला लावून कपाळी हात,
    शेवटी झाला नाईलाज तेवा केली जाहीर पाणीकपात.

    झाली पळापळ ऐकताच शब्द पाणीकपात,
    साठवा पाणी नाहीतर लागेल आपलीच वाट.

    पाणीकपात पाणीकपात जाहीर झाली पाणीकपात,
    ड्रम पिंप सारे भरले, शिवाय वाट्या-भांडी, आणि कपात.

  • वर्षाऋतू …..ऋतू नवजीवनाचा…..

    उन्हाळ्याचा शेवट…मे महिन्याचे शेवटचे दिवस. सगळीकडे नुसत्या सुकाल्याच्या खुणा पसरलेल्या. भेगाळलेली जमीन, झाडे जणू जळून गेलेली, गवत वळून सोने झालेले, प्राण्यांची अन्न-पाण्यासाठी वणवण चालू. लोक पंख्याकडे बघत उकाडा दूर न केल्याबद्दल त्याला दोष देत घामाघूम होतायत. सूर्य तर केवळ जणू जगाला भाजून काढण्यासाठीच तळपतोय. सगळेच लोक घामेजून पाण्याच्या आणि शीतपेयांच्या शोधात आहेत. कुत्री मांजरांसारखी जनावर तर सार्वजनिक नळातून गळणाऱ्या एकेका थेंबावर तुटून पडतात. झरे, ओहाळ, नद्या-नाले पार आटून गेलेत. जगातील सगळ्यात बुद्धिमान समजणाऱ्या प्राण्यांनी बनवलेले सगळे पाणीसाठे खोल गेलेत. आणि बिचारा काहीच करू शकत नाही. नाइलाजानी  पाणीकपात जाहीर झालीये. थोडक्यात सगळीकडे औदासीन्य पसरलं आहे आणि सगळे फक्त आकाशाकडे डोळे लावून त्या काळ्या मेघाची प्रतीक्षा करत आहेत. आणि तो मात्र क्षितिजावरही साध दर्शनसुद्धा देण्याचे कष्ट घेत नाही. कायम सगळ्यांपासून लपत, लांब जात, चिडवत असतो. अजून आतुरतेने वाट बघायला भाग पडतो.

    “अरे तो आला रे!!!!!!!!!!!! तो बघा तिथे….” ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते त्या काळ्या ढगाला दूर क्षितिजावर बघून सगळे उल्हासीत झाले. पण थोड्याच वेळात निराशेच्या निश्वासांशिवाय काहीच उरले नाही….मेघ जणू लपाछपी खेळल्या सारखा हुलकावणी देऊन दूर कुठेतरी निघून गेला.सगळे आपले नशिबाला दोष देत बसले. त्याशिवाय त्यांच्या हातात होते तरी काय? पण थोड्याच दिवसात श्री. मेघ आले आणि या वेळी सगळ्या कुटुंब काबिल्यासकट आले आणि चांगले ३-४ महिने मुक्कामाच्या तयारीनेच आले. सगळ्या कुटुंबाला बघून सगळेच आनंदी झाले. झटक्यात वातावरण बदलले सगळीकडे उत्साह संचरला. थंड वारे वाहू लागले. सगळे आकाश व्यापून मेघ कुटुंबीयांनी पृथ्वीवासियांसाठी सावली धरली. त्यांच्या मागे गेलेला  सूर्य आपले साम्राज्य धुळीला मिळाल्याने निराश झालेला दिसत होता. श्री. मेघांनी त्याचे साम्राज्य हस्तगत केले. भेगाळलेली कोरडी जमीन आता अजून भेगांचा त्रास नाही असा विचार करत होती तर प्राणी अन्नपाण्याची वणवण संपेल या विचारात. माणसे आदल्या दिवशीच्या पाणी कपातीमुळे रिकाम्या असलेल्या नळांना पाणी कधी येईल याची वाट आता बघायची नाही या विचारात. सगळेच जण आता सम्राट मेघ पृथ्वीवर जीवनाचा पहिला थेंब कधी पडतात याकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत. आणि अखेर तो क्षण आला, मेघांच्या गर्जना सुरु झाल्या जणू ते सगळ्या जनतेला ओरडून सांगत आहेत, “आम्ही आपल्या मागण्या ऐकल्या, साम्राज्य हाती घेतल्यावरची पहिली घोषणा आम्ही करत आहोत. प्रजाजनहो, लवकरच आम्ही आपल्यावर पर्जन्यवृष्टी करून आपणाला उपकृत करू.”

    आणि घोषणा झाल्यावर अगदी थोड्याच कालावधीत, दिलेल्या आश्वासनानुसार सम्राटानी पृथ्वीवर जीवनाचा सडा पडायला सुरुवात केली. ज्याच्यासाठी ही पृथ्वी आसुसली होती तो पर्जन्यवर्षाव  होत होता. सगळे प्रजाजन खुश झाले. झाडे जणू प्रदीर्घ आणि शांत झोपेतून उठल्यासारखे ताजेतवाने झाली. आपल्या भेगांच्या जखमा आता भरल्या जाणार या विचारांनी जमीन कोण आनंदात होती. इतकी कि लगेच तिनी हिरवागार शालू नेसून आनंद व्यक्त सुद्धा करून दाखवला. झरे, ओहाळ डोंगरांच्या अंगाखांद्यावरून उसळ्या मारत आपला आनंद व्यक्त करत होते. नद्या आनंदानी दुथड्या भरून जीवन वितरणाचे आपले कार्य पार पाडण्यासाठी वेगात धावत होत्या. तहानलेले सारे जीव आपली तहान त्या मधुर पाण्यानी शांत करत होते. सम्राट मेघांच्या साम्राज्यातील सगळे प्रजाजन सुखी होते आणि सम्राटाच्या दीर्घ कारकिर्दीची मनोमन कामना करत होते…..