अस्वस्थ मी
कधी कोणता विचार मनात डोकावेल हे सांगता येण खरच कठीण आहे बुवा. खर सांगायचं तर मी आत्ता रात्री २:३० ३ ला जागं असण्याचा काडीचाही संबंध नव्हता. पण गल्लीतल्या श्वान परिवारातील सदस्यांनी आपल्या जातीबांधवांना जणु कुठल्याशा आकस्मिक सभेला आवतण द्यायला सूर लावले अन् निद्रादेविनी माझ्याशी फारकत घेतली. तिकडे दूरवरच्या श्वान बंधुंनी लागलेल्या सूरात सूर मिसळले.
खोलीतला गुडुप आंधार टक्क उघड्या डोळ्यांनी बघत मी अंथरुणात पडून होतो, भींतीवरल्या घड्याळातला सेकंद काटा आपल्या टिकटिकीनी त्याला मिळालेल्या उपेक्षेचा जणू सूडच घेत होता. पडल्या पडल्या मन असंख्य विचारांची वळणे घेत भरधाव वेगानी पळत होते कुठल्याशा अज्ञात ठिकाणाकडे. केवळ किती वाजले ते बघायला म्हणून हातात घेतलेल्या मोबईल स्क्रीन वरुन नेहमीच्या सफाईनी बोटं फिरू लागली आणि मनात येईल ते लिहायचे असे म्हणत हे खरडत बसलोय.
कुठलाही विषय डोक्यात नाही की मनातही रुंजी घालत नाही. बस मन सांगेल ते लिहीत बसुया……. या वाक्यानंतर दोन मिनीट एक अक्षरही लिहीता येत नाही असं कायमच का होतं? लिहायला बसायच्या (आत्तापुरतं म्हणायचं तर पडल्या पडल्या लिहायला सुरू करायच्या) आधी धबधब्यासारखे येणारे विचार नेमके कुठे दडी मारून बसतात देव जाणे.
अगदी आधीच्या क्षणापर्यंत विचार असतो. नविन पाहिलेल्या चित्रपटाबद्दल लिहावं, की तिन्हीसांजेला हलकेच कानी पडलेल्या पुरीयानी छेडलेल्या आठवणी लिहव्या? कालंच वाचुन झालेल्या सुब्रतो बागचीच्या झेन गार्डनबद्दल लिहुयात हा विचार पक्का होतो न होतो तोच अजुन एक वळण घेउन दुपारीच पाहीलेल्या अप्रतिम छायाचित्रापुढे येतो अन् झेन गार्डनच वर्णन करायला सरसावलेली लेखणी पुन्हा निःशब्द होते.
काय लिहायचे हेच नक्की होत नसताना, कानाशी गुणगुणत आलेला डास मालकंस चंद्रकंसचे सूर सोडून भैरवि आळवायची वेळ झाली हे सुचित करून गेले. बाहेर श्वान समुदायाची आकस्मिक सभा देखिल विसर्जित झाली आहे. मीपण पुन्हा निद्रादेवीची आराधना करावि म्हणतो.
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.