आज बरोबर वर्ष झालं नाही? अशाच एका धुंवाधार कोसळणाऱ्या पावसात मला सोडून तू परत फिरलास. सवयीप्रमाणे तू गल्लीच्या कोपर्यावर दिसेनासा होईपर्यंत मी तशीच दारात उभी होते. तू कोपऱ्यावर वळलास पण मी मात्र तिथेच उभी होते. किती वेळ, माहित नाही. गेले दोन तास तू जो शब्दांचा समुद्र माझ्यासमोर रिता केलास तो आत्ता कुठे माझ्या डोक्यात शिरत होता. खरं तर पहिल्या दोन वाक्यातच माझं डोकं पूर्ण बधीर झालं होतं. अगदी एखाद्या चित्रपटात दाखवतात न तसं. आजूबाजूला एक विचित्र शांतता, डोळ्याच्या समोर धूसर होत चाललेल्या आजूबाजूच्या निशब्द हालचाली. सुन्न मन आणि निर्विकार चेहेरा. खरंच निर्विकार होता का रे? कदाचित अविश्वास डोकावत असेल कुठून तरी. अर्थात तुझ्या लक्षातही आलं नसेल म्हणा. मनानी तू केव्हाच पुढे निघून गेला होतास. मुक्त होतास. ‘आपले’पणाचे बंध कधी तुटले ते मला कळलेच नाही. तुटले, की तू तोडलेस? विचारीन म्हणते कधी भेटलास तर.
गेले वर्षभर वाटत होतं, गेला आहेस मला सोडून. एका खूप खोल पोकळीमध्ये ढकलून. इतकं खोल की दिवसाचा प्रखर सूर्य पण एखाद्या दूरच्या ताऱ्यासारखा वाटायचा. (more…)