पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…..

गेले काही दिवस भारताच्या इज्जतीचे पंचनामे लगोलग जगभर प्रसिद्ध होत आहेत. कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे. बहुचर्चित (अर्थातच या सगळ्या प्रकारांनी) राष्ट्रकुल स्पर्धा. ज्या आपल्याकडे होणार हे खूपच आधी समजले होते (सुदैवच म्हणायाचे). मग आपले महारथी कलमाडी साहेब पुढे आले आणि सगळे संयोजनाचे खा ते (खाते) आपल्या समर्थ हातांत घेतले. मग सुरु झाली ती राष्ट्रकुल स्पर्धांचे शिवधनुष्य पेलण्याची तयारी. पाठीशी होता राष्ट्रकुल युवा स्पर्धांचा दांडगा (?) अनुभव. पटापट सूत्रे हलली. निविदा सुटल्या. कामांची विभागणी झाली. (नक्की कामांचीच?) आणि भल्या मोठ्ठ्या व्यवस्था नामक गाड्याला गती आली. अर्थात कूर्म गतीच होती ती यात वादच नाही. पण कूर्म का होईना गती तर मिळाली.


हळू हळू दिवस कमी होत होते. कामांच्या फाईली सरकत होत्या. क्रीडांगणे, राहण्याच्या सदनिका आकाराला (?) येत होत्या. मग अचानक लक्षात आला की दिवस फारच कमी राहिलेत आणि कामा तर हवी तशी संपलीच नाहीत. मग लगेच बैठका झाडल्या. भराभर सूचना गेल्या कामे लवकरात लवकर पूर्ण करा. अंतिम मुदती सुधारून ठरवण्यात आल्या. मात्र कामगार आणि पैसा मात्र काही वाढला नाही. परिणामस्वरूप कामे उरकायच्या मागे मंडळी लागली. दिवस जवळ येत होते तसे कामे आकाराला येताना आता किमान दिसत होती. पण शेवटी भारत देशात जे होणे तेच झाले. लक्षात असे आले की अरे पुढचे प्रवेशद्वार तर मस्त सजलंय पण बाकी दारांना मात्र अजून गीलावाच झाला नाहीये. म्हणजे सौंदर्य स्थळे तर उत्तम सजली पण आवश्यक सोयी सुविधा, क्रीडांगणे खेळांसाठी तर तयारच झाली नाहीयेत. परदेशी खेळाडूंच्या राहण्याच्या जागा अजून बऱ्याच अपूर्ण आहेत. पुन्हा एकदा बैठका झाल्या, मंत्री गट, अधिकारी गटांच्या भेटी झाल्या. पाहण्या झाल्या. पुन्हा सुधारित मुदती आल्या. थोड्या प्रमाणात साधनसामुग्रीत वाढ झाली. पुन्हा कामे नेटानी सुरु झाली.


अचानक एके सकाळी लोकांनी त्यांचे दूरदर्शन साचा चालू केला तर बातमी झळकली की राष्ट्रकुल स्पर्धांसाठीच्या तयारीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मग पुन्हा तीच नेहमीच्या घटना सुरु झाल्या. चौकशी समिती, मंत्र्यांच्या बैठका आणि बरेच काही. कलमाडी साहेब आपले छातीठोकपणे सांगत होते की असे काही नाही झालेले सारे काही आलबेल आहे. सर्व तयारी नियोजनानुसार चालू आहे आणि या स्पर्धा यशस्वी होणार आहेत. पण बिचार्यांवर विश्वास ठेवायला कोणी तयारच होत नाही. त्यातच भारताचे परम मित्र भारतातील हस्तकांना हाताशी धरून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतात. नेहमीच्याच साधनांनी हो. बॉम्बस्फोट आणि परदेशी नागरिकांवर गोळीबाराच्या घटना स्पर्धा स्थळा जवळ होतात आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संघटना सुरक्षेच्या परीक्षणासाठी डेरेदाखल होतात.


इतका सगळा झालेला की कमी होतं तर स्पर्धांसाठी बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळतो. त्याच दुपारी भारत्तोलन; म्हणजेच मराठीत वेटलिफ्टिंग हो; ज्या ठिकाणी होणार त्या सभागृहाचे छत कोसळते. आणि समोर येतो तो बांधकाम या बाबतीतला हलगर्जीपणा आणि स्पर्धांच्या अगदी १० दिवस आधीपर्यंत अपूर्ण असलेली खेळाडूंच्या राहण्याच्या ठिकाणची गैरसोय. अनेक सदनिका अर्धवट झाल्यात, स्वच्छतेच्या नावानी आनंदी आनंदच आहे. भारताच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या पान तंबाखूच्या पीचकाऱ्यांची नक्षी सगळ्या सदनिकांमध्ये काढली आहे. गाद्यांवाराच्या चादरी तर कोणे एकेकाळी पांढऱ्या असतील अशा जाणवत होत्या. त्यावर बरेच डाग पडलेले होते.
दरम्यानच्या काळात निसर्गानी पण आपले हात साफ करून घेतले. आयतीच सारी माणसे कोंडीत सापडलेली त्याला. धुंवाधार पाऊस पडला आणि दिल्लीत कधी नव्हे तो भला थोरला पूर आला. रस्ते पाण्याखाली गेले.पुन्हा एकदा बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उभा करायला क्रीडानागरीतला कोराकार्करीत रस्ता पार खचून गेला. सदनिकांमध्ये पाणी साचलं, दिल्लीत डेंग्यूची साथ पसरली. हि सगळी वृत्ते परदेशी वृत्तामाध्यामांतून प्रसिद्ध झाली आणि अनेक अग्रमानांकित खेळाडूंनी स्पर्धेतून माघार जाहीर केली. इतकं सगळं झालं तेवा कुठे पंतप्रधानांनी मध्ये हस्तक्षेप करून बैठक घेतली, स्वच्छतेचा, सुरक्षेचा, अपुर्या कामांचा सगळ्या बाबींचा आढावा घेतला. आणि बाकीची कामे २४ ते ४८ तासात पूर्ण करायला सांगितली.


आता मला सांगा जे इतक्या वर्षात जमला नाही ते १-२ दिवसात होणारे का? आणि इतकं सगळं झालं तरी कलमाडी साहेब आपले तेच पालुपद लावून आहेत. “सारे काही नियोजित कार्यक्रमानुसार चालू आहे, स्पर्धा नक्की यशस्वी होणार.” नाही म्हणायला राष्ट्रकुल स्पर्धांच्या अधिकाऱ्यांनी थोडा अनुकूल विचार मांडलाय; तयारी समाधानकारक आहे म्हणून. पण एकंदरीत परिस्थिती आणि वृत्ते बघता सामान्य जनतेचे मत तर ठाम झालंय. एकंदरीत परिस्थिती अवघड आहे आणि या सगळ्यांनी आपापली खा ती उत्तम सांभाळून देशाची शान जगात पार धुळीला मिळवली आहे. आणि आपल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे “बघा बघा बघा सगळी कामे नित चालू आहेत. १-२ दिवसात बाकी कामे संपतील…आम्ही कितीही जोरात पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…”

Continue Reading