इतिहास, वर्तमानाचा आदिपुरुष!

आज या क्षणी आजूबाजूला जे घडतंय त्याची बीजे भूतकाळात पेरलेली असतात असं आपण सतत ऐकत असतो. पण फुकाचे तत्वज्ञान म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत आपण कायम पुढे निघून जातो. याच पुढे निघून जाण्यानी कदाचित आपण स्वतःच्या भविष्यावर काही परिणाम करत असू. बऱ्याचदा अशा गोष्टी आपल्याला धार्मिक, अध्यात्मिक वगैरे वाटतात. पण अगदीच व्यवहारी विचार केला तरी यात भरपूर तथ्य असल्याचे लक्षात येतं. अगदी अत्ताचेच उदाहरण घ्या नं. अटलजींच्या सरकारनंतर आलेल्या सं पु आ च्या सरकारच्या कामगिरीवर सारेच नागरिक नाराज होते. त्यामुळेच तर इतक्या प्रचंड प्रमाणात एकच पक्षाला बऱ्याच दशकांनी स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

अजून जर थोडं मागे गेलो तर स्वातंत्र्य संग्रामातील घटनांबद्दल पण हेच म्हणता येईल. अगदी प्लासीची लढाई झाल्यापासून जी बीजे रोवली गेली त्यांची परिणीती १८५७ मध्ये झाली, ज्या पासून प्रेरणा घेत वासुदेव बळवंतानी मोठा संग्राम उभा केला. पुढे याच असंतोषाची धग जिवंत ठेवून प्रखर पणे लढा पुढे चालू ठेवला ते लाल – बाळ – पाल या त्रिकुटानी. कॉंग्रेस बाहेरून काम करणाऱ्या अनेक क्रांतिकारक देखील आपापल्या मार्गांनी प्लासीमध्ये घडलेल्या घटनांचेच परिणाम म्हणून काम करत होते.

हाच विचार आपल्याला वैज्ञानिक प्रगतीबद्दल करता येईल. आज आपण अवकाशातील अनंताचा वेध घेण्याच्या गोष्टी करतोय ते त्याच इतिहासातील गॅलिलिओ, कोपर्निकस आणि इतर संशोधकांच्या कामांच्याच आधारावर की. कदाचित त्यांनी देखील प्राचीन भारतीय ग्रंथांचा अभ्यास केला असेल. अगदी भारतात येऊन वगैरे नाही पण पूर्वीच्या इराणी आणि इजिप्शियन व्यापाऱ्यांनी नेलेल्या महित्याच्या आधारे केला असेल. या ठोस पणे नं सांगता येणाऱ्या भागाला आपण विज्ञानाचे पुराण म्हणू हवं तर. इतिहासात विकसित केलेल्या वेगवेगळ्या औषध योजनांचा वापर करूनच तर आपण प्लेग आणि देवी सारख्या भयानक रोगांपासून मुक्त झालो आहोत. कल्पना करा जर ती औषधच नसती तर आज देखील हे रोग धुमाकूळ घालत राहिले असते.

अगदी तुम्हाला आम्हाला पटवायला म्हणून आपण आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरणच बघुयात. आपल्या शिक्षण क्षेत्रातील ज्या काही पद्धती आहेत त्यामुळे तुमचा भूतकाळ तुमचा वर्तमान ठरवत असतो. किमान तुम्ही नोकरीला लागेपर्यंत तरी. १०वीत जर कमी गुण असतील तर तुमच्या पदवी अभ्यासक्रमात मिळालेल्या पहिल्या वर्गाचा काहीही उपयोग उरत नाही. म्हणजे तुमचा १०-१५ वर्षांपूर्वीचा भूतकाळ तुमची आजची नोकरी मिळेल की नाही हे ठरवतोय. किंवा जर तुम्ही ४ वर्षांपूर्वी एखादी नोकरी स्वीकारली असेल तर त्याच प्रकारच्या नोकऱ्या आता तुम्हाला मिळणार. विषेशतः आयटी कंपन्यांमध्ये हा अनुभव प्रमुख्यानी जाणवत असेल. सलग रात्रपाळीत काम केले तर फक्त रात्रपाळीच मागे लागते. अमुक एका प्रोजेक्ट चा अनुभव गाठीशी असेल तर त्याच प्रकारचे प्रोजेक्ट तुम्हाला मिळतात.

हाच विचार जसा आपण थोडं मागे जाऊन केला तसं आपण पुढे जाऊन पण करू शकतो. आपण आज जो विचार करतोय, ज्या तत्वांसाठी काम करतोय, त्यांचा आपल्या भविष्यावर प्रभाव पडणार आहे. याच विचाराच्या आधारानी आपले पुनर्जन्म आणि पूर्वजन्माच्या संकल्पना देखील थोड्या फार प्रमाणात उकलून सांगता येतील पण त्यात इतरही अनेक मुद्यांचा विचार करावा लागेल. पण तूर्तास तरी आपला इतिहास हा वर्तमानाचा आदिपुरुष आहे हाच विचार आज मला अगदी योग्य वाटतोय.

आता माझे हे विचार कशाचे आणि कोणाचे आदिपुरुष होतात ते बघायचं.


Discover more from Adi's Journal

Subscribe to get the latest posts sent to your email.


Comments

Leave a Reply