Adi's Journal

Pieces of my thourhgs

सुट्टी

सुट्टी म्हटलं की सगळ्यांना आठवत ती शाळेतली सुट्टी, मग ती मे महिन्याची उन्हाळी सुट्टी असो किंवा दिवाळीअसो. अर्थात दोन्ही सुट्ट्या तशा वेगळ्याच. दोन्हींचे आनंद वेगळे, दोन्हीत करायची धमाल वेगळी. उन्हाळी सुट्टी मित्रांबरोबर आईच्या ओरद्ण्याला न भीक घालता भर उन्हात धुडगुस घालायची तर दिवाळीची सुट्टी मामाच्या घरी, माविकडून किंवा आजी आजोबांकडून लाड करून घेण्यात घालवायची. पण शाळा संपली तशी ही हक्काची सुट्टी पण कुठे गुडूप झाली देव जाणे.

वाटलं होतं, कॉलेजला गेलो की सगळेच दिवस तसे सुट्टीचेच असतील पण कसले काय. ११वी, १२वीत क्लासची गडबड आणि पुढे कॉलेजला सबमिशन्स, प्रॅक्टिकल अशी सगळी व्यवधानं मागे लागलेली. आणि नंतर नोकरी धंद्याला लागल्यावर तर कसली सुट्टी आणि कसलं काय. राहून राहून शाळेतल्या सुट्ट्या आठवतात. तो सलग मिळणारा रिकामपणा, कसल्याही डेडलाईन्स नाहीत, कोणत्याच कमिटमेंट नाहीत. बस फक्त तुमचं वेळ, तुम्हाला हवं तसं जगण्यासाठी.

पण सगळ्यामिळून १२-१५ सुट्ट्या मिळणार वर्षभरात त्यातही ५० प्रकारचे नियम पळून सुट्ट्या. ८ महिन्यांनी येणाऱ्या कुठल्याशा सणासाठी सुट्टी राखून ठेवा. परदेशात नोकरी करणार असाल तर आत्ताच सांगतो, भारतात घरी येणार असाल तर कदाचित दीड दोन वर्षांत सुट्टी नाही हं. घरी निवांत थांबण्यासाठी लागतील न तितक्या रजा.

नोकरी लागली की मिळणाऱ्या शनिवार रविवार सुट्ट्यापण सगळ्या घरकामातच जातात. बिल भरा, बँकेच्या चकरा मारा. संसारी असाल तर किराणा माल, इतर घरगुती कामं काय कमी असतात. आणि अजून साल तरी आठवड्याभरच खोलीवरचा पसारा तुमच्याकडे आ वासून बघतच असतो. या सगळ्या रुटीनचा कधी कधी खरंच वीट येतो बुवा. बर कंटाळा आलं म्हणून आज जातच नाही अशी कॉलेजला असताना मिळणारी सवलतही इथे गायब झालेली असते.

खरंच, एके दिवशी या कंटाळवाण्या रुटीनचा कडेलोट होतो आणि कोणी आलं बरोबर तर त्यांच्या सोबत किंवा एक्त्यानीच कुठे फिरून यायचे बेत ठरू लागतात. बहुदा एक दोन दिवसाच्या ट्रिप्सचे प्लान्स होतात. आणि कधी बाईक तर कधी कार शनिवार रविवारी शहराबाहेर पडण्याच्या दिशेनी धावू लागतात. दुधाची तहान ताकावर काढल्याचं समाधान तरी मिळते. तेवढीच तरतरी पुढच्या आठवड्याच्या रुटीनमध्ये बुडून जायला.

तरी पण सुट्टी म्हटलं की आज सुद्धा आठवते ती भावंड, मित्र यांच्याबरोबर धमाल करत घालवलेली सुट्टी. शेवटी काय, कायमच “लहानपण देगा देवा” हे मागणं मागत मागत आयुष्य जगताना असे छोटे छोटे विरंगुळ्याचे क्षण जपायला शिकलं की आपोआपच आनंदात दिवस काढता येतात हे नक्की.


Discover more from Adi's Journal

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related Posts

One thought on “सुट्टी

Leave a Reply