Your cart is currently empty!
निवडणूक २०१४ : थोडे माझ्या मनातले
फार दिवसांनी आज लिहितोय. बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडत होत्या, निवडणुकांची धामधूम होती, त्यावर रंगणाऱ्या उच्च स्वरातल्या चर्चा वृत्तवाहिन्यांवरच काय तर आपल्या आजूबाजूला नाक्या-नाक्यावर पण घडत होत्या. इतक्या प्रचंड प्रमाणात समाजाला हलवून टाकणारी माझ्या आठवणीतली ही पहिलीच निवडणूक. अर्थात या आधी झालेल्या निवडणुकांच्या वेळी तसं काही फार कळत नव्हतं. किंबहुना आत्ताही आपण फार मोठे राजकारण पंडित झालोय अशातलाही भाग नाही. पण गेले दोन तीन महिने जे काय बघत होतो, ऐकत होतो अथवा पेपरमध्ये वाचत होतो त्याचा कळत नकळत कुठे तरी मनात विचार चालूच होता.
आपण कितीही म्हटलं मला राजकारणात रस नाही, तरी देखील या साऱ्या वातावरणात मनात फक्त आणि फक्त या निवडणुकांचाच विचार साऱ्यांच्या मनात चालू असणार. गेल्या ४-५ वर्षात ज्या प्रमाणात भारतात देशाला शरमेनी मान खाली घालायला लागतील अशा प्रकारचे घोटाळे, अतिरेकी हल्ले, शेजारी राष्ट्रांनी काढलेल्या कुरापती आणि त्यावर सरकारचे तेच ठरलेले “तीव्र शब्दात निषेध” करून कबुतरं उडवणे या साऱ्यांनी भारतीय मन कुठे नं कुठे निश्चितच अस्वस्थ होत होते. प्रत्येक जण बदलाची वाट पाहत होता. अनायासे ती संधी या निवडणुकांमध्ये आपल्याला मिळाली आणि साऱ्याच जनतेनी बदलाच्या बाजूनी कौल दिला.
या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारी मागे नक्कीच ही गेल्या ४-५ वर्षातली निराशा प्रेरक ठरली असणार. मध्यंतरी “आप” वाला एक पर्याय उपलब्ध झालं होता पण दिल्लीत घाईत सत्ता हस्तगत घेऊन तितक्याच त्वरेनी राजीनामा देण्याच्या निर्णयांमुळे कुठे नं कुठे त्यांच्यावरचा विश्वास नक्कीच डळमळीत झाला असणार. पण मोदींच्या पाठीमागे होती ती त्यांची संघटन कुशलता आणि गेल्या १२-१३ वर्षाच्या गुजराथच्या प्रगतीचा सतत उंचावणारा आलेख. इतक्या झंजावती प्रकारे प्रचार करणारा नेता माझ्या बऱ्याचशा ऐकीव आणि थोड्या बहुत वैयक्तिक अनुभवात तरी पहिलाच पाहत होतो.
आता निवडणुकीत हरल्यावर कोंग्रेस आणि बाकी सारे म्हणतात की मोदींनी अत्यंत पद्धतशीर प्रचार केला, सोशल मीडियाचा भरपूर उपयोग केला म्हणून ते जिंकले. अरे पण मला सांगा, प्रचार हा पद्धतशीरच करायचा असतो नं. आपलं उभे राहिलोय तर काही तरी केलं पाहिजे म्हणून प्रचार केलात तर हरणार आहातच. त्यांनी योग्य प्रचार केला म्हणून ते जिंकले असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्यांना योग्य कार्याचे प्रशस्तीपत्रकच देताय की.
असो. बाकी लोक काहीही म्हणोत पण अटलजींच्या अत्यंत उत्तम कार्याकालानंतर गेल्या २ निवडणुकांमध्ये ११५ च्या आसपास जागा मिळवणाऱ्या ‘भाजप’ला एकहाती बहुमत मिळवून देण्याची करामत मोदींनी नक्कीच करून दाखवली आहे. एक कुशल संघटक आणि अमोघ वक्ता म्हणून त्यांना याचे पूर्ण श्रेय द्यायलाच हवे. पण हा विजय म्हणजे एक प्रचंड मोठं जबाबदारीचं दडपण आहे. देशाचा प्रत्येक नागरिक मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर बरीकाईनी नजर ठेवून असेल. आणि विरोधक तर डोळ्यात तेल घालून मोदी सरकारची एखादी किरकोळ चूक देखील नजरेआड होऊ देणार नाहीत.
देशातील प्रत्येकाच्या नव्या सरकार कडून अपेक्षा आहेत. तरुणांच्या उच्च शिक्षणाच्या, रोजगाराच्या तर महिलांच्या सुरक्षेसाठी अपेक्षा असतील. सैन्यदलाला अपेक्षा असेल ती शेजारी राष्ट्रांनी काढलेल्या कुरापातींना कठोर उत्तर देण्याची, शिवाय त्याच वेळी अंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षा असतील की भारतीय उपखंडात युद्धाला तोंड फुटू नये याची. साऱ्या जनतेची एकूण पायाभूत सुविधांसाठी अपेक्षा असेल, महागाई आटोक्यात आणण्याची अपेक्षा असेल. उद्योग जगाकडून आयात-निर्यात धोरणाबद्दल अपेक्षा असेल, पोलीस दलांच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरेशा मनुष्यबळाच्या अपेक्षा असतील.
या साऱ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून न जाता सम्पूर्ण कार्यक्षमतेने काम करणे खरोखरच एक कसोटी असणार. पण ५ वर्षाचा कालावधी या साऱ्या अप्केशांच्या पूर्ततेसाठी तसा कमी आहे. पण त्यादृष्टीनी काही पाऊले तरी नक्कीच या काळात पुढे टाकली जातील अशी अपेक्षा सारेच भारतीय करत असणार. त्या पुढील वाटचाली साठी साऱ्या भारतीयांकडून नवीन सरकारला खूप शुभेच्छा!!!
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.
Leave a Reply