
दिवाळी अंक, चित्र आणि लेखन या साऱ्या बद्दल अत्यंत दांडगा अनुभव असलेल्या एका महान व्यक्तीची काल भेट घेण्याचा योग आला तो Prose Publications च्या आमच्या साहित्यकट्ट्याच्या निमित्ताने. श्री. चंद्रमोहन कुलकर्णी, कित्येक वर्षांची चित्र-तपस्या असलेला एक सुंदर कलाकार! अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे, दिवाळी अंकातील साहित्याला अनुरूप किंबहुना कित्येक वेळा त्या साहित्यातील एक वेगळाच पैलू उजेडात आणणारी चित्रे रसिक वाचकांच्या हातात देणारा हा कलाकार कट्ट्यावर अगदी मनमुराद ऐकता आला.
हो, अगदी बरोबर वाचलं तुम्ही. ऐकता आला. चंद्रमोहन जी हे जितके भन्नाट चित्रकार आहेत तितकेच उत्तम लेखक देखील आहेत. त्यांची कुंचला आणि लेखणी, दोन्हीवर जबरदस्त पकड आहे. काल त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी मांडलेला एक विचार मनात घर करून गेला. कित्येकदा साहित्यावर किंवा कथेसाठी चित्र काढताना त्या कथेतील एखादा भाग निवडून त्याच चित्रण होतं. पण या मुद्द्यावर त्यांचं मत मांडताना चंद्रमोहन म्हणाले, “चित्रकाराने कथेलाही काहीतरी द्यायला हवं.” कथेचा आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करून आपलं काही आकलन त्या चित्रांतून आले तर अधिक कलात्मक निर्मिती होईल.
इतर कलांकडे डोळस नजरेने बघत त्यांचा आस्वाद घ्याव, तुमच्या दृष्टिकोनातून तो अनुभव पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. यातूनच कलाकार म्हणून आपलं भावविश्व समृद्ध होत असतं. कालच्या कट्ट्यावरच्या गप्पांतून चंद्रमोहनजींनी असेच माझ्या भावविश्वाच्या अकाऊंट मधे अजून एक फिक्स डीपॉझिट तयार केले. या नवीन इनव्हेस्टमेंट साठी कट्ट्याला खूप खूप प्रेम!
Leave a Reply