Category: promo

  • हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

    220px-Hutatma_Chowk.jpg१ मे, जगभरात साजरा होतो तो कामगार दिवस म्हणून पण इथे महाराष्ट्रात या १ मे ला विशेष धार मिळाली ती १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा. माझा जन्म १९८८ सालचा त्यामुळे ना मी भारताच्या स्वतंत्राचा लढा पहिला ना संयुक्त महाराष्ट्र चळवळ अनुभवली. शालेय इतिहासातून सुद्धा स्वातंत्र्ययुद्धाची तुरळक माहिती मिळाली पण स्वातंत्र्योत्तर काळात भारत घडलेल्या घटना आमच्यापर्यंत दंतकथेसारख्याच येत राहिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंधित जी गोष्ट कानावर पडली ती शाहीर विठ्ठल उमप यांच्या आवाजातली अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मुंबईची छक्कड. पण तो काळ डोळ्यासमोर उभा केला तो या महाराष्ट्र दिनाला Zee5 वर प्रदर्शित झालेल्या हुतात्मा या वेबसिरीजमधून. आता ZEE5 वर हुतात्मा ऑनलाइन पहा

    १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत ‘बॉम्बे स्टेट’ हे गुजराथी आणि मराठी भाषिकांचे द्विभाषिक राज्य बनले आणि विदर्भ आणि मराठवाडा हे मराठी भाषिकांचे भाग मराठी राज्यापासून वेगळे राहिले. या अन्यायाचा परिपाक म्हणून उभी राहिली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ. जिच्या नेतृत्वाची धुरा केशवराव जेधे, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, कॉम्रेड डांगे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या अनेक तालेवार मंडळींनी सांभाळली. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्या दमदार पोवाडे, लावण्या आणि इतर लोकगीतांनी या चळवळीची नाळ लोकांशी जोडली गेली.

    54513714_2246019115454915_1465764964554916429_n

    हुतात्मा हि वेबसिरीज आपल्यासमोर उलगडते तीच मुळी १९५६ साली फ्लोरा फाउंटनवर झालेल्या नरसंहाराच्या दृश्यांनी. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या घोषणांच्या नादात चाललेल्या शांततापूर्ण मोर्च्यावर केलेल्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या माऱ्यानंतर उसळलेल्या गोंधळाला आळा घालायला मोरारजी देसाईंनी गोळीबाराचा आदेश दिला आणि १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले. याच गोळीबारात जीव गमावलेल्या गिरणी कामगाराच्या मुलीच्या ‘विद्युलता सावंत म्हणजेच विद्युतच्या भोवती ही सारी कथा गुंफली आहे.

    त्या काळात महाराष्ट्रात असलेल्या वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांची अत्यंत योग्य अशी सांगड या वेबसिरीज मध्ये घातलेली दिसून येते. काँग्रेस, कम्युनिस्ट चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती या साऱ्यांच्या राजकीय पटावर घडणाऱ्या घडामोडींचा मुंबईच्या स्थानिक मराठी माणसाच्या जीवनात काय प्रभाव पडत होता, तरुण मन वेगवेगळ्या विचारधारांकडे कोणत्या पद्धतीने आकृष्ट होत होते हे सारं काही मी आत्तापर्यंत पाहिलेल्या पहिल्या दोन भागातच इतकं समर्पक रीत्या मांडले गेले आहे की मला पुढचे भाग कधी एकदा पाहीन असे झाले आहे.

    सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, जयंत सावरकर, रवींद्र मंकणी, लोकेश गुप्ते, आनंद इंगळे असली जबरदस्त उमदी फळी घेऊन रिंगणात उतरलेल्या या वेबसिरीज मध्ये नायिकेचं काम करणारी अंजली पाटील, पहिल्या दोन भागात भाव खाणारे काम करणारा वैभव तत्ववादी आणि अभय महाजन तितक्याच ताकदीने उभे आहेत. अभय महाजनचे ‘श्रीरंग पत्की’ या वार्ताहराचे पात्रसुद्धा अगदी योग्य वठले आहे. बातमीदाराने दिलेल्या बातमीवर आपल्या लेखणीने “ध चा मा” करण्याची ताकद ठेवणाऱ्या संपादकाच्या हाताखाली कराव्या लागणाऱ्या कामाबद्दलची खंत छान उठून येते.

    या शिवाय मला अगदी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे संवादांच्या भाषेचा आणि पात्रांच्या पार्श्वभूमीनुसार केल्या गेलेल्या वेगवेगळ्या बोलींचा वापर. भीमाबाई नाईकांच्या भूमिकेत छाया कदमांनी वापरलेली कोकणी मराठी एक चरचरीत फोडणी देऊन जाते. किरकोळच हिंदी संवाद असलेल्या पात्रांच्या तोंडच हिंदी सुद्धा मस्त जमून आलं आहे. मालिकेचा कपडेपट सांभाळणाऱ्या पोर्णिमा ओक यांनी एकदम चोख काम करत १९५६ साल प्रेक्षकांसमोर उभे केले आहे. पण या साऱ्यांच्या चार पाऊले पुढे राहून पहिल्यांदा हे सारं काही मनाच्या पडद्यावर निर्माण करून मग आपल्यासाठी चित्रीकरण करून घेणाऱ्या जयप्रद देसाई यांच करावं तितकं कौतुक कमीच होईल. ऐतिहासिक कथानकाला हात घालतांना कित्येक गोष्टींचा दहादा विचार करावा लागतो हे काही चित्रपटांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विरोधावरून आपल्या लक्षात येतेच. पण जयप्रद देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हुतात्मा’ अगदी उत्तम बनली आहे. उरलेले भाग बघण्याची उत्सुकता टिकवून ठेवण्याच्या जागांवर प्रत्येक भाग संपतो आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा नवीन काय पहायचे हा प्रश्न प्रेक्षकांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.

    धागा – भावाबहिणीचे ग्रामीण मातीतले नाते उलगडणारा चित्रपट.

    राखी, मग ती रेशमी असो, सोन्या-चांदीची असो, सुती असो की अगदी आजकाल येते तशी झगमग करणारी LED दिव्यांची असो; भावाबहिणीसाठी खूप पवित्र आणि ताकदवान बंधन आहे. धागा, ही ZEE5 ची फिल्म फिरते ती याच पवित्र बंधनावर. राज गुप्तांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालीला हा चित्रपट साहिल केणे आणि अश्विनी लाडेकर यांच्या उत्तम अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर पोचतो. गोष्टीचा भर या नात्याच्या आजूबाजूने फिरत असला तरी या चित्रपटात घडणारं महाराष्ट्राच्या खेड्यातलं जीवन अत्यंत खुबीने दाखवण्यात यश आले आहे.

    4930286883_7be2623793_b

    शंकर आणि उमा या भावंडांच्या नात्याला धरून पुढे जाणारा हा चित्रपट मराठी ग्रामीण जीवनाच्या अनेक अंगांना अगदी सहजपणे स्पर्श करत जातो. चित्रपट सुरु होतो तोच अगदी मराठी मातीत रुजेलेल्या आणि तुम्हा आम्हाला आपल्या लहानपणात घेऊन जाईल अशा गोट्या खेळण्याच्या सीननी आणि तिथून आपण शंकरच्या मागे मागे फिरत हा सिनेमा बघतो. भावाबहिणीच नातं उमलत जातं पण त्याच बरोबर उमाच्या मनात रुजलेल्या प्रेमाचं दर्शनही या कथेत घडत जातं. या उलगडत जाणाऱ्या नात्यांच्या पार्श्वभूमीवर वाजणारं संगीत नक्कीच मराठी मातीत रुतलेलं आहे.

    रक्षाबंधनाच्या वेळेचं गाणं आणि त्या वेळेचं चित्रीकरण आपल्याला थेट ग्रामीण महाराष्ट्रात घेऊन जात. तिथलं छोट्या छोट्या सणांचं जे उत्साहाचं वातावरण असतं ते अगदी छोट्याशा सीन मधून अगदी छान दाखवल आहे. चित्रीकरणाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या समीर दांडेकर चं कौतुक करावे तितके कमीच आहे. पण याच चित्रीकरणाला सुस्मित लिमये आपल्या पार्श्वसंगीताने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

    50121372_215464939396405_163418471662749537_n

    वास्तविक हे भावाबहिणीचं नातं काही आपल्या चित्रपटसृष्टीला नवीन नाही. श्रेयस तळपदे आणि श्वेता प्रसादचा “इक्बाल” तसच संजय सुरी आणि जुही चावलाचा “माय ब्रदर निखील” याच नात्याच्या काही वेगळ्या छटा आपल्यासमोर घेऊन येतात. अगदी इतकंच कशाला, चित्रपटाचा मुख्य विषय नसला तरी “जाने तू या जाने न” मधून दिसणारं जेनेलिया डिसुझा आणि प्रतिक बब्बर यांच्यातलं भावाबहिणीच नातं मनातल्या काही विशेष तारा छेडून जातं.

    अर्थात या नात्याचं महत्व म्हणा, किंवा आकर्षण म्हणा काय केवळ आपल्यालाच आहे असे नाही. आपल्याकडे जरी याला रक्षाबंधन आणि भाऊबीज असं धार्मिक महत्व असलं तरीसुद्धा साऱ्या जगाला या नात्यातलं प्रेम तितकंच प्रेमळ आणि महत्वाच वाटतं. असेच भावंडांच्या नातेसंबंधांचे वेगवेगळे पैलू अनेक इंग्रजी चित्रपटांमधून पण हाताळले गेले आहेतच. Her Name Is Sabine असेल, किंवा २००९ चा My Sister’s Keeper असेल, यातून सुद्धा भावंडांमधलं एक वेगळे नाते उलगडायचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केलं गेला. अजूनही काही चित्रपट आहेत त्याबद्दल आपल्याला या पेजवर माहिती मिळू शकेल.

    पण या साऱ्या सिनेमांपेक्षा धागा या नातेसंबंधाचा एक वेगळा पदर घेऊन आपल्यासमोर येतो. ग्रामीण महाराष्ट्रातील जनमानसावर असलेला रूढी, परंपरा यांचा पगडा किती घट्ट आहे याचाही संदर्भ या चित्रपटात अत्यंत खुबीने गोवला आहे. याबद्दल याचे कथा पटकथा लेखक शाद्वल यांचे विशेष आभार मानायला हवेत. आणि त्याच बरोबर मराठी भाषेचा खास ग्रामीण लहेजा पकडण्याचे काम संवाद लेखकांच्या टीमने अगदी चोख बजावले आहे. त्यामुळे कुठेही चित्रपटाची पकड प्रेक्षकांवरून सुटत नाही. डॉ. भाग्यश्री चिटणीसांनी साकारलेली आई तशी पडद्यावर अगदी दोन तीन शॉटपुरतीच आहे पण आई म्हणजे वात्सल्य हे ठसवून गेली आहे. शंकरची मित्रमंडळी आणि उमाचा मित्र सुद्धा आपल्याला अगदी सहज आपल्या आजूबाजूला सापडतील यात शंका नाही.

    उमाच्या मनात रुजलेल्या प्रेमाचं काय होतं? वडिलांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शंकर आपल्या बहिणीची काळजी घेतो का? तिच्या पाठीशी उभा राहतो का? या साऱ्या प्रश्नांना या चित्रपटात अगदी छान आटोपशीर पद्धतीने हाताळले आहे. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्नांनी घर करणे सुरु केले आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी…

  • काळजात उतरलेली कट्यार

    काळजात उतरलेली कट्यार

    18192468_1919179508297339_3990675473360239615_o.jpg

    अगदी राजे रजवाड्यांच्या काळापासून साहित्य संगीत नृत्य नाट्य आपल्या महाराष्ट्राला तसे नवे नाही. पण अभिनय आणि संगीत यांच्या एकत्र जोडीने मराठी मनाचा पगडा घेतला तो संगीत नाटकाच्या उदयापासून. देवल, खाडिलकर, मास्टर कृष्णराव, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, राम गणेश गडकरी, इत्यादींपासून सुरू झालेला हा लेखक संगीतकार गायक ही नावं घेत घेत आपण पोचतो ते पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यापर्यंत. सौभद्र, शाकुंतल, एकच प्याला, वगैरे नाटकांतून घेतल्या गेलेल्या विषयांपेक्षा एकदम वेगळा विषय दारव्हेकर मास्तर घेऊन आले. तसा तो विषय काही अगदीच अपरिचित होता अशातला भाग नाही. महाराष्ट्राला असलेल्या थोर शास्त्रीय संगीत परंपरेत या विषयाची थोडी बहुत चर्चा होतीच. पण संगीतात अगदी खोलवर रुजलेल्या घराणेशाहीला इतक्या उघडपणे रंगमंचावर आणणे हे सुद्धा एक कौतुकच. आणि या विषयाला चार चांद लावले ते पंडित अभिषेकींनी. दोन घराण्यातील सांगीतिक भेद, वेगवेगळी सौंदर्यस्थानं आणि नाटकातील द्वंद्व अगदी ठसठशीतपणे उभं केलं आपल्या पदांमधून.

    katyar_kaljat_ghusali_ver6

    आणि नुकताच ३० तारखेला याच नाटकावर आधारित अफलातून चित्रपट Zee5 वर रिलीज झाला. सुबोध भावे पुन्हा एकदा ही अजरामर कलाकृती मराठी रसिकांसमोर घेऊन आला “कट्यार काळजात घुसली” या चित्रपटातून. जसं हे नाटक रुपेरी पडद्यावर उभं करणं मोठं कौशल्याचं आणि जबाबदारीचं काम होतं तसंच त्याचं संगीत निर्माण करणं एखाद्या शिवधनुष्यासारखच होतं. अभिषेकी बुवांनी संगीत दिलेली आणि वसंतरावांनी अजरामर केलेली पदं पुन्हा रेकॉर्ड करणं आणि शिवाय मूळ चालींमध्ये मिसळून जाईल अशा नव्या चाली बांधणं आजिबात सोपं काम नव्हतं. पण शंकर एहसान लॉय या त्रिकुटानी हे शिवधनुष्य नुसतं पेललं नाही तर त्यावर प्रत्यंचाही चढवली. मूळ नाटकातील ‘या भवनातील गीत पुराणे’ या पदाच्या ऐवजी येणार ‘दिल की तपिश’ हे  गाणं अगदी खांसाहेब आफताब हुसेन यांच्या गायकीचे होऊन गेले आहे. आज अभिषेकी बुवा असते तर त्यांनी या चालीसाठी तिघांचे अफाट कौतुक केलं असतं.

    तसे पाहिले तर सारेच भारतीय चित्रपट संगीत प्रधानच. त्यामुळे पाश्चात्य जगात असलेली musical film ही संकल्पना आपल्याकडे वेगळी अशी निर्माणच नाही झाली. पण तरीही मराठी चित्रपटातून काही संगीताच्या सभोवती कथा गुंफलेले काही चित्रपट आधीही होऊन गेले. लोकशाहीर राम जोशी, पिंजरा, आणि काही वर्षांपूर्वी आलेला नटरंग हे चित्रपट महाराष्ट्राच्या लावणीभोवती गुंफले गेले. पण प्रामुख्याने तथाकथित पांढरपेशा समाज आणि तमाशा यांच्यात असलेली दरी मोडून कुण्या एकाचा त्या क्षेत्रात निषिद्ध मानला गेलेला प्रवास या एका समान धाग्याने हे चित्रपट बांधले गेले आहेत.

    या व्यतिरिक्त २००९ मध्ये आलेला जोगवा हा यल्लम्मा देवीच्या नावाने जोगवा मागत फिरणाऱ्या जोगत्यांच्या आयुष्यावरचा एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला चित्रपट. हे जोगते देवीची भजनं, जोगवे गात गात जोगवा मागत आयुष्य घालवत असल्याने या चित्रपटाची धाटणी सुद्धा एक musical चीच आहे. पण कट्यार… चा विषय आणि सांगीतिक संदर्भच त्याला या साऱ्या चित्रपटांपासून वेगळा काढतो.

    नाही म्हणायला Morning Raga हा शबाना आझमी यांची भूमिका असलेला चित्रपट शास्त्रीय संगीताची बाजू चित्रपटांमध्ये घेऊन आला होता. आजच्या काळात जेव्हा आधुनिक संगीताचा बोलबाला आहे, रॉक मेटल वगैरे संगीत मोठ्या प्रमाणावर सादर होतं अशा वातावरणात शबाना आझमींच्या पात्राला त्यांचे कर्नाटक शास्त्रीय संगीत एक मोठया कार्यक्रमात सादर करायची महत्वाकांक्षा घेऊन जगत असते. पण कट्यारमधली महत्वाकांक्षा आपल्याला एका निराळ्याच जगात घेऊन जाते. कट्यारची गोष्ट उलगडते ती राजेरजवाड्यांच्या काळात जेव्हा कला आणि कलाकार राजाश्रयाने वाढत होती. ही एक अप्रस्थापित संगीतशैलीची प्रसिद्धीसाठीची महत्वाकांक्षा आहे.

    ही महत्वाकांक्षा, एक वेगळ्याच पातळीवरचे अटीतटीचे सांगीतिक द्वंद्व, मानवी स्वभावाचे ईर्षा, असूया, प्रेम, कालासक्ती असे वेगवेगळे पदर हे सारे एक चित्रपटातून दाखवतांना नाटकात उपलब्ध नसलेलं स्थल स्वातंत्र्य या वेळी सुबोध भावेंनी दिग्दर्शक म्हणून फार सुंदरपणे हाताळले आहे. मला खात्री आहे की हा चित्रपट आपण सर्वांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहिला असेलच. पण इतकी सुंदर कलाकृती पुनःपुन्हा पाहण्याची संधी आता आपल्या अगदी दारात चालून आली आहे. तेव्हा ही संधी तुम्ही आजिबात दवडू नका आणि अभिषेकी बुवांच्या पदांसोबतच शंकर एहसान लॉय यांच्या गाण्यांचा, सुबोध भावे, सचिन पिळगांवकर, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर आणि प्रथमच अभिनय करणारे शंकर महादेवन यांच्या उत्तम अभिनयाचा आनंद घरबसल्या हवं तेव्हा नक्की घ्या.

  • गणेशोत्सव: उत्सव उत्साहाचा आणि पर्यावरणपुराकतेचा

    maxresdefault

    जसजसा श्रावण संपू लागतो तसतसा मराठी मनात उत्साह वाढू लागतो, महाराष्ट्राचा अत्यंत लाडका उत्सव लगेचच सुरु होणार असतो. बाजारपेठा सजू लागतात, गावोगावी लगबग सुरु होते आणि गणरायाच्या स्वागताला महाराष्ट्र सज्ज होऊ लागतो. पण पुण्यात हा उत्साह अजूनच दांडगा असतो. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे स्वरूप, त्याची भव्यता आणि लगबग काही औरच असते. ती अनुभवण्यासाठी तुम्हाला पुण्यातच यायला हवं. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह फार दांडगा असतोच पण घरगुती वातावरणातही अतिशय मन लावून गणरायाची आराधना या काळात पुण्यात होते. तशी या पुण्यातील घरगुती उत्सवाला परंपरा पेशव्यांपासून आहे. पेशवे त्यांच्या खाजगी कौटुंबिक गणरायाच उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करीत असत.

    पण भाऊ रंगारी यांनी पुण्यात १२५ वर्षांपूर्वी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले आणि १८९२ साली पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. लोकमान्य टिळकांनी पुढे १८९४ पासून याचे स्वरूप -आणिकच व्यापक केले आणि पुढे सारा महाराष्ट्र ह्या परंपरेत सहभागी झाला. आज पुण्यातलं या उस्तावाचे स्वरूप अगदी भव्य दिव्य आहे. पण याच भव्यतेमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही प्रयत्नशील असलेल्या पुणेकरांना २०१७ पासून व्होडाफोन इको-पाँड या आपल्या उपक्रमातून हातभार लावत आहेत. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेत, शंभर वर्षांहून जुन्या कसबापेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालिम, तुळशीबाग व केसरीवाडा या ५ गणरायांना आजही मानाचे स्थान आहे.

    पुण्यात घरगुती उत्सवात दीड दिवस, ५ दिवस किंवा गौरीबरोबर गणरायाचे विसर्जन करण्याचीही परंपरा आहे. पण त्याच बरोबर अनंतचतुर्दशीला होणारे विसर्जन देखील कित्येक कुटुंबांत परंपरेने चालत आले आहे. कित्येक सोसायट्यांमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. विविध वयोगटातील रहिवाश्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम केले जाता. दहा दिवस अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. आणि क्षण येतो तो बाप्पांना निरोप देण्याचा. गेल्या काही वर्षात आपल्या सवयींमुळे आपण पर्यावरण पुराकतेकडून पर्यावरण ह्रासाकडे वाटचाल करतो आहोत. सुदैवाने आता महाराष्ट्रात थर्माकोलवर बंदी असल्याने हा एक अपायकारक वापर कमी झाला आहे. पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे नदीत, विहिरीत व इतर पाणवठ्यांवर होणारे विसर्जन चिंताजनक आहे. यावर उपाय म्हणून व्होडाफोन आयडिया कंपनी, पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या सहयोगाने “व्होडाफोन इको-पाँड” ही योजना सलग दुसऱ्या वर्षीही राबवते आहे.

    This slideshow requires JavaScript.

    २०१७ साली याच योजनेअंतर्गत “व्होडाफोन इको-पाँड” मध्ये विसर्जित केलेल्या ३१०० मूर्तींपासून १३ टन प्लास्टर ऑफ पॅरिसवर पुनर्प्रक्रिया केली आणि एक लाख लिटर इतके खत निर्माण केले. हे खत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाटण्यात आले. याही वर्षी पुणे शहरात ७ ठिकाणी हे पुणे शहरात एनआयबीएम, वाकडेवाडी, औंध, खराडी, बाणेर, कल्याणीनगर व चिंचवड लिंक रस्ता येथील व्होडाफोन दुकानांपाशी हे “व्होडाफोन इको-पाँड” उभारले आहेत. यामध्ये आपल्या घरगुती गणरायाचे विसर्जन पारंपारिक पद्धतीत साजरे करता येईल आणि शिवाय यातून पर्यावरणाला अजिबात धोका निर्माण होणार नाही. या ७ “व्होडाफोन इको-पाँड” शिवाय ४ फिरते इको-पाँड देखील वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे “व्होडाफोन इको-पाँड” नक्की कोठे आहेत ते तुम्हाला या सोबतच्या नकाशावर कळेलच पण अजूनही काही शंका असेल तर तुम्हाला ७३९१०००००० या क्रमांकावर फोन करून अधिक माहिती मिळवता येईल.

    Approved Ecopond infographic (2).jpeg

    तेव्हा या वर्षी गेल्यावर्षीपेक्षा जास्त प्रमाणात या “व्होडाफोन इको-पाँड”मध्ये आपल्या घरच्या गणरायाचे विसर्जन करून आपण पुणेकर पर्यावरणाला हातभार लावूया. शिवाय निर्माल्याचेही उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत होऊ शकते. त्याही मार्गाचा अवलंब करून पुन्हा निसर्गाने दिलेलं त्याला परत करण्यात काहीच गैर नाही. पुणेकरांनी १२५ वर्षापूर्वी जशी एक परंपरा महाराष्ट्राला दिली तशीच आणखीन एक काळाची गरज असलेली हि पर्यावरणपूरक परंपरा महाराष्ट्राला देण्याची संधी पुण्याला आहे. पुणेकरांनी ती आजीबात सोडू नये आणि अर्थातच विसर्जन करतांना म्हणयला विसरू नका… “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.”

  • नायकाची बाजी

    नायकाची बाजी

    रहस्यकथा, हा माझा फार आवडता साहित्यप्रकार आहे. गेले पंधरा दिवस मी ख्रितोफर डॉयल च्या कादंबऱ्या वाचतो आहे. त्या वाचतांना एकदम नायकाचा प्रवास ठळकपणे डोळ्यासमोर येऊ लागला. काही कल्पना नसताना या कथेतला नायक एका भयंकर जागतिक कटाचा भाग बनतो आणि पुढे ज्या ज्या चित्तथरारक घटनांमधून गोष्ट पुढे उलगडत जाते. पण नायक म्हटलं की तो एकटा दुकटा थोडाच या पडणार आहे? त्याची तीन चार मित्रमंडळी त्याच्या कंपूत सामील होतात आणि सारे मिळून समोर उभ्या राहिलेल्या प्रसंगांना तोंड द्यायला सज्ज होतात. कित्येक प्रसंगात आपल्या जिवाची बाजी लावून तो संकटांवर मात करतो. कंपूतील प्रत्येकाची असलेली आपापली खासियत आणीबाणीच्या काळात कामाला येऊ लागते. लहानपणी या कंपू प्रकारची ओळख करून दिली ती आपल्या लाडक्या भा रा भागवतांच्या फास्टर फेणेनी. त्याची ती छोटीशी टोळी जाम धमाल करायची.

    C1K1Q-NUAAAnB5g
    भा रा भागवतांचा फास्टर फेणे

    पण एक आहे, या साऱ्या नायकांवर आधारित गोष्टींमधून नुसती गोष्ट पुढे जात नाही तर नायकाचा सुद्धा एक प्रकारचा प्रवास सुरु असतो. बहुतेकवेळा काहीशा योगायोगाने या साऱ्या घटनांमध्ये ओढला गेलेला नायक पुढे या थरारक घटनांमध्ये हिरीरीने भाग घेऊ लागतो. पहिल्यांदा कुठून या लफड्यात पडलो असा विचार त्याच्या मनात येतच नाही अशातला भाग नाही, पण पुढे जाऊन त्याचा आत्मविश्वास वाढतो, बरोबरच्या लोकांची साथ मिळत जाते. कधी कधी काही अप्रिय घटनांमध्ये बरोबरच्या सोबत्यांशी ताटातूट होते किंवा त्यांच्यावर काळाची झडप पडते. पण नायक हे सारे धक्के पचवत पचवत पुढे वाटचाल करतच असतो. आव्हानांसमोर सर्वस्वाची बाजी लावत त्यांच्यावर मात करून बाहेर पडलेला विजयी वीर असा नायक आपल्या सर्वांनाच हवाहवासा वाटतो. पण क्वचित एखादा छोटासा धक्का देत लेखक आपल्याला एखाद्या दुःखांताकडे सुद्धा कधी कधी घेऊन जातो. आर्थर कॉनोन डोईल चा शेरलॉक असाच एक दुःखांत होता, ज्यात त्याच्या पक्क्या वैऱ्यासोबत दोन हात करता करता दोघांना मरण येतं. पण वाचकांच्या प्रेमापोटी त्याला शेरलॉकला पुन्हा एकदा मृत्याच्या दाढेतून ओढून आणावे लागले होते.

    ख्रितोफर डॉयलचा नायक काय किंवा आपला फाफे काय, तो आणि त्याचा कंपू, त्यांचा अचानकच सुरू झालेला हा साहसी प्रवास आणि जीवाची बाजी लावून संकटातून बाहेर पडण्याची जिद्द हे सगळे विचार मनात घोळत होते तोच झी मराठीवर बाजी ही नवीन मालिका येते आहे अशी जाहिरात बघितली. जाहिरातीची युक्ती तर एकदम नामी होती. ऍनिमेशन वापरून बनवलेला ट्रेलर एकदम वेगळाच होता, एखाद्या मालिकेसाठी कधी वापरला गेला नव्हता. महाराष्ट्राचं लाडकं ऐतिहासिक सत्ताकेंद्र पुणे पुन्हा एकदा संकटाच्या छायेत दिसत होतं. शेरा आपलं कपटी जाळं पुण्याभोवती विणत होता. आणि त्या संकटाचा सामना करायला उभा ठाकला होता एक वीर शिलेदार, आपला नायक. जीवाची बाजी लावणारा ‘बाजी’.

     

    आता नायक म्हटला की अर्थातच तो एकटा असणं जरा अवघडच आहे. डॉयलचा नायक ३-४ लोकांचा कंपू घेऊन सगळ्या सहासात उडी घेतो, फाफे त्याचा मित्र सुभाष देसाई आणि मामेबहीण मालू बरोबर बाजी लावतो. तसाच आपला बाजी एकटा दुकटा आला तर कदाचित फाउल झाला असता. तर बाजी, एका लावण्यवती हिराच्या जोडीने येणाऱ्या संकटाचा सामना करायला उभा ठाकला असावा असा किमान ट्रेलर वरून तरी अंदाज येतोय. खेळाचा पट मांडला गेला आहे, दान पडायला सुरुवात झाली आहे. शेराने आपला पूर्ण कपटीपणा बाजीवर लावत चाल केली आहे. आता बाजी अन हिरा कशाची बाजी लावून या संकटाचा सामना करतात हे पाहण्याची उत्सुकता ट्रेलरवरून नक्कीच जागी झाली आहे. शेराशी सामना करतांना बाजी आणि हिरा यांचा प्रवास कोणत्या दिशेने जातो आह हे पाहणेही नक्कीच रोमांचक ठरेल. त्यामुळे झी मराठी च्या प्रेक्षकांनी नक्कीच एका चित्तथरारक कथानकासाठी तयार व्हायला हरकत नाही.