आजीची गोष्ट
मी लिहिता झालो त्याचं कारण मला काहीकेल्या आजतागायत सापडलं नाहीये. गेली ६-७ वर्ष सुचेल तेव्हा सुचेल ते लिहीत गेलो. बऱ्याचदा धागा अर्धवट तुटायचा, कधी वीण पूर्ण जमायची. पण मी वाचता, ऐकता झालो त्याचं कारण म्हणजे आमची आजी. माझ्या आयुष्यात गोष्टींचा कवितांचा प्रवेश झालं तो आजीच्या तोंडूनच. अगदी लहानपणी मला वाटायचा, “आजी कित्ती हुशार आहे नाही. इतक्या गोष्टी पाठ आहेत तिला.” अन् ती सांगायची पण इतकी रंगवून की शेवट येई पर्यंत उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली असे. राम, कृष्ण, इसापनीती अशा पारंपारिक गोष्टींबरोबरच ती बाकीच्याही गोष्टी सांगत असे. त्यात राजा राणी, जंगल, राक्षस असं काही नसे. आमच्यासारख्याच छोट्या मुलांच्या गोष्टी असत. कधीही तिनी पुस्तकातून गोष्टी वाचून दाखवल्याचं मला आठवत नाही.
रविवारच्या मुलांच्या पुरवणीत पहिल्यांदा आजीचा नाव वाचला तेव्हा लक्षात आलं, अरे या गोष्टी आजीनी पाठ केलेल्या नाहीयेत, ती स्वतःच लिहिते. दर रविवारचा पेपर उघडून बघायची घाई झालेली असायची. गोष्टीखाली आजीचं नांव दिसलं रे दिसलं की अधाशासारखी मी ती वाचून काढायचो. पण जर नाव नसेल तर मात्र हिरमोड हून मी त्या पपेरला हातही नाही लावायचो. आजी कधी लिहिते याकडे लक्ष ठेवायला लागलो. तिचं नाव पेपर मध्ये वाचायला बघायला मोठी मजा वाटायची. पुढे केवळ आजीनी सांगितल म्हणून बाकीच्या गोष्टीही वाचू लागलो आणि हळू हळू वाचनाची आवड लागली.
मला आजही आठवतं, एका उन्हाळ्याच्या सुटीत; पाचव्या सहाव्या इयत्तेची असेल कदाचित; आजीच्या कपाटात एका वेगळ्याच रंगाचा कव्हर असलेला पुस्तक दिसलं. चांगला मोठ्ठ होतं. सहज उत्सुकता म्हणून हातात घेतला. त्यावर असलेल्या पिवळ्या रंगाच्या बाईंडिंगचं फारच अप्रूप वाटत होत. चालून पाहू काय आहे ते म्हणून उघडलेलं पुस्तक त्यानंतर मान पाठ एक करून ३ दिवसात संपवूनच मी ठेवलं. आयुष्यात वाचलेलं पाहिलं मोठं पुस्तक, ‘श्रीमान योगी’. त्यानंतर आजीच्या मागे लागून त्यातली कित्येक पुस्तक मी वाचून काढली.
आजीही लिहीत होतीच. आजी केळवल मुलांच्याच गोष्टी लिहिते हा माझा समज कुठल्याश्या बुधवार गुरुवारच्या पेपरच्या पुरवणीनी साफ चुकीचा ठरवला. आजीची एक कुठलीशी कविता आणि एक लेख त्या पुरवणीत छापून आला होता. भोवताली घड्या कुठल्याही गोष्टी आजीच्या नजरेतून सुटत नसता. कुठे बारीकसं जरी कथाबीज दिसलं की पुढच्या दोन दिवसात आजीची गोष्ट तयार असे. घडणाऱ्या घटना इतक्या बारकाईनी अभ्यासता येत की नक्कीच एखाद्या पेपरमध्ये स्तंभ लिहू शकली असती पण तिने तिचं लिखाण आजपर्यंत केवळ छंद म्हणूनच जपलं.
तिच्या राम-कृष्णांच्या गोष्टीतही फारशी चमत्कृती नसते. केवळ अवतार म्हणून कुठलेही चमत्कार तिनी गोष्ट म्हणून सांगितले नाहीत. त्यांच्या कृतीतून दिसणाऱ्या त्यांच्या चातुर्य, शौर्य, लोकांना बरोबर नेण्याची त्यांची हातोटी अशा चांगल्या गुणांबद्दल आजी सांगायची. पण कोणताही पुरावा असल्याशिवाय आजीनी राम-कृष्णांच्या गोष्टीसाठी कोणत्याही घटना घेतल्या नाहीत.
कितीतरी वेळा आजी शिबिरांमध्ये जाऊन गोष्टी सांगायची. पण आता वयापरत्वे असं कुठे जाणे होत नाही. पण नवनवीन गोष्टींना काही अंत नाही. पूर्वी गोष्टी, कविता, लेख लिहून झाले की ते वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोचवायची जबाबदारी आम्हा नातवंडांवर असायची. पण आता दुसऱ्या शहरात असल्यानी पोस्ट खाते इमाने इतबारे आजीची सेवा करतं. आज जी काही थोडफार वाचनाची आवड आहे. सुचेल तसे जे लिहीत असतो तो केवळ आणि केवळ आजीचं आशीर्वाद. तिने अजूनही आमच्यासाठी अशाच चं गोष्टी लिहीत राहाव्यात हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.