कोणीच दोषी नाही बघ…..

इतके दिवस यावर काही लिहिण्याचं टाळत होतो. प्रत्येक जण लिहितोच आहे. पण आता राहवत नाही. अत्यंत बिकट अवस्था असलेल्या शरीरानी अखेर साथ सोडली आणि ती देवाघरी गेली. मी तर म्हणीन सुटली. कित्येक वर्ष भिजत पडलेल्या इतर खटल्यांसारखा हिचाही खटला पडून राहणार. तब्येत सुधारली असती तरी तिच्या वाट्याला सामान्य जगणं आला असतं? “७ च्या आत घरात”ला अनुत्तरीत प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तिच्या मित्रांनीच कशाला कुटुंबियांनी तरी स्वीकारली असती तिला? त्यांचा तरी काय दोष. सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला लावणाऱ्यांचे वंशज आम्ही. कसे स्वीकारणार तिला? इथे तर उघड उघड बलात्कार झालाय. अग्निपारीक्षेचाही संबंध येत नाही. परकीय आक्रमणांच्या वेळी बलात्कार करून बाटवलेल्या स्त्रियांना स्वीकारले नाही तर या एकट्या मुलीला कोणी स्वीकारले असते?

ताई, सुटलीस बघ सगळ्या यातनांमधून. हे लोक खटला तरी काय चालवणार. आधीच्या खटल्यांचा तरी कुठे निकाल लावलाय. वर्षानुवर्ष तसेच पडलेत. ते नराधम निसर्गदत्त मृत्यूच सुख उपभोगून मारणार. तुझ्या शीलाला हात लावण्याचा अपराध करणारेही बहुदा याच सुखाचा उपभोग घेतील बघ. वर गेली आहेस, तिथेच बघ काही होतं का. किमान इथून हे मेले कि तिथे तरी योग्य शिक्षा होऊ दे त्यांना. इथून गेलीस आणि वाचलीस बघ स्वतःच्या स्त्रीत्वाची लाज वाटेल अश्या प्रश्नोत्तारांपासून. त्यांचे प्रश्न ऐकून पण तू विचार केला असतात अत्त्याचार सहन करून गप्प बसलो असतो तर कदाचित कमी त्रास झाला असता. वकिलांचा पण दोष नाहीईये बघ त्यात. १०० अपराधी सुटले तरी चालते त्यांना पण तो १ निरपराध फासावर जाता कामा नये. (अर्थात त्यांनी शिक्षा दिली तरी ती रद्द करायला वर बसलेलेच असतात.)

सुरवातीला तुला वाटलं असेल चला प्रसारमाध्यमे तरी आपल्या बाजूनी उभी आहेत. पण लवकरच तुझा भ्रमनिरास झाला असता. तुझ्यावरच्या अत्त्याचारांचा त्यांनी TRP केला असता. १०० वेळा प्रत्येकानी येऊन तुला, तुझ्या घरच्यांना विचारला असतं, “ये सब आपके साथ हुवा; तो आपको कैसा लाग रहा है?” “तुला बोललं पाहिजे, तुझ्या भावना नक्की कळल्या पाहिजेत. नक्की तुला काय वाटतं.” “जरा details मे बता सकते हो exactly आपके साथ क्या क्या हुवा.” जो मित्र तुझ्या मदतीला उभा ठाकला होता, ज्यांनी तुझ्यासाठी बेदम मार खाल्ला त्याला पण विचारायला कमी केलं नसतं; “आपकी दोस्त के साथ ये सब हुवा है तो आज आप कैसा मेहसूस करते है?” अरे नालायाकांनो तुम्हाला काही लाज? ज्या बिचाऱ्याच्या मनाला तिला वाचवता न आल्याबद्दल असंख्य वेदना होत असतील, जो कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही, त्याला काय विचारताय. तुझा TRP झाला नाही वाचलीस बघ तू.

हजारोंचा जमाव आला तुझ्या मदतीसाठी धावून, काळे कपडे, काळ्या फिती, काळे फोटो की असेल नसेल ते सगळं काळं करून आले. अरे लोकांनो पण तुमची मनं काळी झालीत त्याच काय करणार आहात? निषेध मोर्च्यावरून घरी जाताना दिसलीच एखादी फटाकडी पोरगी कि माना मोडेपर्यंत तोंड उघडी टाकून लाळ गाळत बघत बसणार. अचकट विचकट टीका टिपण्णी करणार. थोडी लाज वाटू द्या रे. अर्थात तुमचा दोष नाहीच तो. वर्षानुवर्ष तुमच्या आदर्श सिनेकालावान्तांकडून तेच बघताय. शिरीष कणेकरांनी एकदम बरोबर सांगून ठेवलाय की. जणू पुढचे सारे आयुष्य सुखाचे जावे म्हणून आपला एक संकेतिक चिन्ह म्हणून चित्रपटात अतीप्रसंग दाखवतात. अरे पण का? हि विकृती का दाखवावी लागते तुम्हाला?

ते जाऊदे हो. आता तर नट्याच कपडे फेडायला अधिक उत्सुक असतात. मुळात फेडायला अंगावर आधी असतंच कितीसं. वीतभर कपडे पण नकोसे होतात. चित्रपटाच्या कथा ऐकतानाच विचारतात, बेडसीन न किसिंग सीन किती ते सांगा. मग माझी किंमत सांगते. अर्थात नट नट्यांचा तरी त्यात फारसं दोष नाहीचे. वास्तववादी चित्रपटांची मागणी प्रेक्षक करतात या नावाखाली निर्माते पण तेच बनवतात हो. मला खरच सांगा भारतातल्या कोणत्या शहरांमध्ये बायका वितभर कपड्यांच्या तुकड्यांवर फिरतात. एकावेळी ५-५ पुरुषांबरोबर संबंध ठेवतात? अर्थात परत दोष न निर्मात्यांचा न प्रेक्षकांचा. प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. निर्माते म्हणतात प्रेक्षक मागतो, प्रेक्षक म्हणतात निर्माता दाखवतो.

तुझ्या तब्येतीची चौकशी करायला झाडून सगळ्या नेत्यांनी या न त्या प्रकारे हजेरी लावली. आजिबात विश्वास ठेऊ नकोस त्यांच्यावर. २६० लोकनेते कोणाची तरी तुझ्यासारखीच अवस्था केलेली असूनही त्या खुर्च्यामध्ये जाऊन बसलेत. ढोंगी लोकांना लाजा पण वाटत नाहीत. उघड उघड यादी देतात आमच्यावर असलेले गुन्हे म्हणून. द्यावीच लागते म्हणा त्यांना. निवडणूक आयोगाचा नियमच आहे. पण असा नियम करणार नाहीत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना निवडणूक नाही. शेवटी जगाचा नियम आहे. जोवर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर आम्ही निरपराध असतो. त्या नेत्यांचा पण दोष नाहीचे. हे सगळे गुन्हे केल्याशिवाय त्यांना कोणी तिकीटच देत नाही ग निवडणूक लढवायला. नेता होण्याची एन्ट्रन्स टेस्ट आहे असंच म्हण न हवं तर.

कोणाकोणाचे दोष नाही याची यादी तरी तू नी मी किती मोठी करत बसणार? तसा तुला स्वसंरक्षण जमलं नाही यात तुझाही दोष नाहीये आणि मी इथे यादी करत बसण्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही यांत माझाही काहीच दोष नाहीये.

Continue Reading