स्वतःबद्दल

आयुष्यात स्वतः बद्दल बोलायची किती वेळा गरज असते? तरी सुद्धा आपण कोणत्या तरी ओळखी साठी धडपडत असतो. मग कोणी ती ओळख चांगल्या कामांनी करतो तर कोणी वाईट. ही ओळखच बऱ्याच वेळा माणसाला आपला आयुष्य उगीचच बदलायला लावते. खूप मोट्ठे उद्योगपती अथवा कोणी पुढारी, लोकनेते वगैरे झालात की मनाला पटेल आवडेल असा वागताच येत नाही. तुम्हाला मन मोकळा हसता येत नाही. मित्र मैत्रिणींबरोबर भटकता येत नाही. सततची सुरक्षा रक्षकांची आजूबाजूला घोटाळणी.जणू नजरकैदच. ओळख हवी म्हणून धडपड आणि मग आपण इतके का प्रसुद्ध व्यक्ती झालोय म्हणून पश्चात्ताप. मला सुद्धा स्वतःची अशी ओळख हवीच आहे की. पण असा मन मारून जगायला लावणारी नको बुवा. अर्थातच  ही ओळख चांगल्या कामांनीच तयार करायची असा निर्धारच केलाय आणि कामाला लागलोय. नव्या वाट शोधतोय. जमल्या तर त्या रुळवूदेखील. मार्गक्रमण चालू आहे. रस्त्यात काय वाढून ठेवलाय ते मलाही आत्ता माहित नाहीये. जसं समोर येईल तसं कळेलच की. वाट बघा काय काय सापडतंय त्याची.

भूमाहितीशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेला मी वास्तविक स्थापत्य अभियंता. पण शिकतानाही साहित्य, कला या कडे ओढ जास्त. छायाचित्रणाचा छंद आहे. मनाला भावलेल्या गोष्टी कायम आठवणी ठेवण्यासाठी विज्ञानाने दिलेली ही देणगी खरच खूप सुंदर आहे.  पण पोटापाण्यासाठी काही करावे लागते म्हणून स्वतःचा व्यवसाय आहे.  हो जे शिक्षण घेतला त्यातच काम करतोय. हे पण महत्वाचेच नाही का. सांगायचा मुद्दा असा कि मी  सध्या पुण्यात असतो. थोडी फार वाचन लेखनाची आवड आहे. जमेल ते सुचेल ते आपला खरडत असतो आणि आपल्यापुढे मांडत असतो. बघा रुचतंय का.