Adi's Journal

Pieces of my thourhgs

थोडे हिंसेबद्दल

आजकाल सगळीकडेच हिंसाचार माजलाय, हिंसक प्रवृत्ती वाढत आहेत, अल्पवयात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय या साऱ्या चर्चा रंगलेल्या असतात. पण या साऱ्यामधे लोकांना अपेक्षित हिंसा असते ती शस्त्रानी अथवा शारीरिक ताकदीच्या जोरावर झालेली हिंसा. हिंसा ही काही फक्त एखाद्याला गोळ्या घालून, चाकू भोसकून ठार मारलं तरच होते असं नाही. अथवा एखाद्याला जबर मारहाण करून जखमी केलं तरच हिंसा होते असं नाही. मला आज बोलायचय ते एका वेगळ्या हिंसेबद्दल. मनात येणाऱ्या आशा – आकांक्षांना पल्लवीत करण्याऐवजी दाबून टाकले जाते. मी बोलतोय ते या हिंसेबद्दल.

कुणाच्या मनात फुलत असतात ती नवनिर्मितीची स्वप्नं पण त्यांना जाग आणून धोपट मार्गांवर ढकलण्याच पातक करतो आपण अगदी नकळतपणे. सतत दाखवला जातो तो दुसऱ्यांनी त्या मार्गांनी केलेल्या प्रगतीचा आदर्श. पण एखाद्यानी घेतलेली अनवट वाट पुढे दुसऱ्यांसाठी राजमार्ग होऊ शकतो या शक्यतेची ती हिंसाच तर होते. भले ही वाट घडवताना समाजाला हवे त्या गतिनी यश, पैसा प्रसिद्धी मिळणार नाही पण ती वाट पडण्याचे काम करणाऱ्याला किती समाधान मिळेल. त्या समाधानाचा आधीच गळा आवळला जातो.

तसेच आपल्याकडे काही समाजांमध्ये अगदी कोवळ्या वयात सन्यास लादला जातो. भले त्या वेळी त्या निर्णयाला त्या मुलाचा अथवा मुलीचा होकार असेल परंतु पुढील आयुष्यात तरुणपणी आपल्या मनात काय भावना निर्माण होणार आहेत याची काहीच कल्पना नसताना स्वीकारलेली बंधनं पार पडताना त्यांच्या हातून घडते ती एक प्रकारची स्वहिंसाच नाही का? अशा बंधनांमुळे त्या व्यक्तीवर किती दडपण येत असेल. त्या कोवळ्या भावनांच्या नाजूक फुलांना नख लावतांना त्यांच्यावर किती ताण येत असेल.

केवळ कौटुंबिक अथवा सामाजिक बंधने आहेत अथवा कुठल्याशा कळत पडलेल्या रुढी परंपरांच्या नावाखाली एखाद्या स्त्रीला विवाहानंतर चार भिंतींमध्ये डांबले जात असेल तर आजच्या एकविसाव्या शतकातील ही अत्यंत क्रूर हिंसा म्हणावी लागेल. सुदैवानी महाराष्ट्रात हे प्रमाण जरा कमी आहे परंतु उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उच्च शिक्षण होऊन सुद्धा केवळ आमच्याकडे बायकांनी नोकरी करायची पद्धत नाही या एका कारणासाठी त्यांच्या डीग्र्यांच्या आचेवर भाकऱ्या भाजल्या जातात. आज देशात पूर्वीसारखी आर्थिक परिस्थिती राहिली नाहीये. एकाच्या सहा आकडी पगारात देखील संसाराचा खर्च भागेनसा झालाय. शिवाय मुलींचे उच्चशिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी जेव्हा मुलीवर घरी बसण्याचे बंधन घातले जाते तेव्हा घडते ती हिंसाच की. एका स्वप्न बघणाऱ्या मनाची, त्या स्वप्नांमागे उडण्याची ताकद असलेल्या पंखांची.

दूरदर्शन वरच्या जवळ जवळ सगळ्याच मालिकांमध्ये अशी एका स्त्रीनी दुसऱ्या स्त्रीला दिलेली हिंसक वागणूकच दाखवली जाते. सासू सुनेला छळते, नणंद केवळ जावेचे वाटोळे व्हावे म्हणून भावाच्या नोकरी धंद्याला त्रास होईल असे प्रयत्न करते. अर्थात प्रत्यक्षात असे घडण्याचे प्रमाण बरेच कमी असेलही पण हा हिंसाचार बघून मनात कुठेतरी उदास व्हायला होता. स्वतःची चीड वाटू लागते पण रात्रीची झोप झाली की आपण पुन्हा त्याच नेहमीच्या कार्यक्रमामध्ये अडकून जातो. मनात वाटणारी चीड ती तळमळ कुठे तरी दाबून गेलेली असते. समाजातले अन् व्यवस्थेतले बदल होतील तेव्हा होतील. गरज आहे ती चीड तो संताप बाहेर येण्याची, काहीतरी बदल स्वतःतच घडवायची.

Related Posts

3 thoughts on “थोडे हिंसेबद्दल

  1. हां आता कसं?? अस पाहीजे लिखाण!!
    आपले कान कसे फक्त ऐकत रहातात, जीभेवर मात्र नियंत्रण असते.
    त्या मुळे उत्तमोत्तम वाचत रहा. किती लिहील ह्या पेक्षा काय लिहिलं हे महत्वाचे! बाकी वाल्मिकींनी रामायणा व्यतीरिक्त अजून काही लिहिल्याचे कानावर नाहीच!!

Leave a Reply