Adi's Journal

Pieces of my thourhgs

इट्स ऑल अबाउट प्रायॉरीटी

मध्यंतरी फेसबुकवर एक उपदेश झळकत होता. “No one is busy in this world, its all about priority”. बऱ्याचदा हा संवाद तोंडावर फेकला जातो तो दोन व्यक्तींमध्ये नं उरलेले संभाषण संवाद अथवा नं होणाऱ्या भेतीगाठींबद्दल. असाच काहीसा उपदेश वाचता वाचता मनात विचार येत गेले पण त्या वेळी ते लिहिले गेले नाहीत. You know, after all it’s all about priorities. अर्थात मीही काही तुमच्याहून वेगळा नाहीये. तुम्हीही म्हणाल हा लागला प्रवचन द्यायला, पण आज मी थांबवणार नाही कारण आता या लिखाणाला माझं प्राधान्य आहे.

हा तर मी सांगत होतो, हे बिझी असणं, खूप कामं असणं बऱ्याचदा कोणाला भेटायच्या वेळी वापरला जातं खरं पण बघा नं कित्येक वेळेला आपण आपल्याला एखादी गोष्ट का जमत नाही तेव्हा हेच उत्तर पटकन तोंडावर येतं. “काय रे गाणं वगैरे चालू आहे का सध्या?” “छे रे आता वेळच होत नाही बघ”. “यार तुझी चित्र जाम भारी असायची, सध्या ब्रश अन् रंग थंडावलेले दिसतायत.” “हो रे काय करणार, कामं इतकी वाढली आहेत. मान वर करायला वेळ नाही.” इत्यादी इत्यादी संवाद कायमच आपल्याला ऐकू येतात.

खरंच आपण इतके हरवलेले असतो का? वास्तविक पाहता हे गाणं, चित्रकला वगैरे वैयक्तिक आनंदासाठीच असतं. पण स्वतःला देण्याइतका पण वेळ आपल्याकडे नसतो आजकाल. बाकी मित्र मंडळ, समाजात मिसळणे वगैरे तर मग दुरचीच गोष्ट. अन् समाजकार्य, एखाद्याला मदत असल्या गोष्टींसाठी मग रिटायर्ड झाल्यानंतरचा वेळ आपण सोयीस्करपणे राखून ठेवतो. जणू आपण भविष्य बघुनच आलेलो असतो की आपण रिटायर्ड झाल्यावर एकदम टूणटूणीतच असणार आहोत. पण या साऱ्या ‘नंतर करू’ मध्ये आपण हे विसरतो की याच छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला किती आनंद मिळतो.

मी बिझी आहे हे उत्तर आजकाल sorry आणि thank you इतकाच वापरून वापरून पुचाट झालाय. मग ते काम असो की स्वतःचाच छंद. लहान लहान मुलं देखील आईनी आजीनी एखादं काम सांगितला की मोबाईल वर गेम खेळता खेळता उत्तर देतात “मला वेळ नाही नंतर करतो.” एकूणच सारे जण आपण फार कामात बुडून गेल्याचा मुखवटा घालून फिरत असतो सदैव. एकूणच साऱ्या जीवनाचाच प्राधान्यक्रम एकदा बसून ठरवायलाच हवा आहे. अर्थात यासाठी तुम्ही busy नसाल तर…

Related Posts

2 thoughts on “इट्स ऑल अबाउट प्रायॉरीटी

Leave a Reply