Adi's Journal

Pieces of my thourhgs

माँटुकले दिवस : छोट्या – मोठ्याची निखळ मैत्री

IMG_20150704_112236कित्येक वेळा म्हटलं जातं आयुष्य आनंदात जगायचं असेल तर आपल्यातलं लहान मुल कायम जाग ठेवावं. पण रोजच्या ऑफिसच्या कटकटी, कामाचे ताणताणाव, आजूबाजूला घडणाऱ्या, मनाला त्रासदायक अशा गोष्टी, या साऱ्या रामरगाड्यात ते बिचारं लहान मुल कुठे हरवून जातं कळतच नाही. पण आजूबाजूला कोणी छोटा दोस्त मिळाला तर? तर आयुष्यात किती बहार येईल हे फक्त “माँटुकले दिवस”च आपल्याला सांगू शकेल. पुस्तकाचं एकही पान न चाळता घेतलेलं हे पहिलच पुस्तक. हे नावच इतकं कमाल आहे की मला तर त्या पुस्तकाच्या शेल्फ पासून पुढे हालताच येईना. त्यात फिकट निळ्या, हिरव्या रंगत बनवलेलं सुंदर मुखपृष्ठ आणि संदेश कुलकर्णींनी लिहिलेलं आहे हे बघून तर ह्या खरेदीवर शिक्कामोर्तबच झालं.

त्या तीन साडेतीन वर्षाच्या पिटुकल्या मेंदूत काय वेगानी नवनवीन कल्पना जन्माला येत असतात. त्यातूनच त्याचे नवनवीन खेळ तयार होतात. कधी चाळीच्या जिन्याचा रेल्वेचा डबा होतो, अचानक कुठलीशी खिडकी तयार होते. त्यातून दिसणाऱ्या अफलातून जागाच दर्शन घ्यायला तुम्हा आम्हाला माँटुचा मित्रच व्हावं लागेल जसा संदेश झाला. वास्तविक वयात दसपटीहून जास्त फरक असूनही त्यांच्या मैत्रीचे घट्ट विणलेले धागे बघून मला तर हेवा वाटला. कधी ती रेल्वे धृवीय प्रदेशात पेंग्विन्सबरोबर खेळायला घेऊन जायची तर दुसऱ्या मिनिटाला माँटु रेल्वेतून प्रवास करून आफ्रिकेतल्या जंगलात सिंहांची आयाळ ओढायला तिथे हजर असायचा.

टीव्हीवर दिसणाऱ्या कृष्णाला बघून स्वतः कृष्ण व्हायची कधी हुक्की येईल काही सांगता येत नाही. प्रत्येक वेळी प्रसंग एकच, कालियामर्दन. त्यात माँटु कृष्ण आणि गावकरी, यशोदा, कृष्णाचे दोस्त, आणि टीव्ही बघणारा प्रेक्षक या साऱ्या भूमिका पार पडायला संदेश. हा खेळ संपतो न संपतो तो दुसरा. खरच, लहानग्यांचे मेंदू दमत नाहीत हेच खरं. पण या साऱ्या कल्पना लढवता लढवता माँटु खूप काही शिकवून जातो, छोट्या छोट्या गोष्टी. पण आजूबाजूच्या इतर मोठ्यांसारखं संदेश मात्र त्याला काही काही शिकवत नाही.

त्या छोट्याश्या डोळ्यांमध्ये असणारं कुतूहल आपापल्या परीनी निरीक्षण करत करत गोष्टी समजून घेत होतं. सायकलवरून येणारा गॅसवाला, चाळीसमोर सळसळणारा हिरवागार पिंपळ, आपल्या नानीकडे जाताना लक्षात राहिलेली फक्त दोन स्टेशन्स, बांद्रा आणि नालासोपारा, एक न दोन अशा अनेक गोष्टी टिपत माँटु मोठा होत होता. पुस्तकाच्या मध्यात माँटुच्या दोन गोड मैत्रिणींची एंट्री होते. सिद्धा आणि सिद्रा, आणि माँटु आपले हाणामारीचे खेळ सोडून त्यांच्याबरोबर खेळायचा प्रयत्न करू लागतो. आधीचा संदेश आणि माँटु इतकाच असलेला कंपू आता माँटु, संदेश, सिद्धा आणि सिद्रा असा दुप्पट होतो आणि एक वेगळीच धमाल येते.

कडेवर घेतले असताना “मै तुम्हारी आंखोमे मुझे देख सकता हू” असं अचानक आलेलं वाक्य उगीचच आपलं वय वाढल्यानी फिलोसोफिकल वगैरे वाटून जातं पण वास्तविक त्या चिमुकल्या जीवाला आपल्या डोळ्याच्या बाहुलीत दिसणारं स्वतःच प्रतिबिंबच फक्त अपेक्षित असतं. हट्टीपणा, कुतूहल, मस्ती, चिमुकली स्वप्न हे सारा काही असलेलं हे पुस्तक आपल्याला पण माँटुसारखा मित्र असायला हवा अशी इच्छा मनात रुजवून माँटुच्या चवथ्या वाढदिवसाच्या “मोठ्ठा झालोय” या कल्पनेवर संपत.

Montuसुंदर मुखपृष्ठ, आणि पुस्तकातल्या आठवणींना अगदी साजेशी अशी रेखाचित्रे या गोष्टी पुस्तकातल्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतात, आणि आपल्यालाही दिसू लागते ती जिन्यातल्या रेल्वेची खिडकी, त्यातून दिसणारे हत्ती, गायीभोवती उद्या मारणारं वासरू, त्यांच्या खेळातले राधा कृष्ण, कालियामर्दन.

एकूण काय तर संदेशच्या मनात सतत जागं असणारं लहान मुल आपल्याही मनातल्या छोट्याशी मैत्री करतं. आणि आपल्यालाही सांगतं “मै तुम्हारी आंखोमे मुझे देख सकता हू”

पुस्तकाचं नाव: माँटुकले दिवस.

लेखक: संदेश कुलकर्णी.

प्रकाशक: मनोविकास प्रकाशन.

प्रकाशन वर्ष: २०१५

पाने: १३४

ISBN – 978-93-83850-93-8

मूल्य: ₹ १५०/-

Related Posts

One thought on “माँटुकले दिवस : छोट्या – मोठ्याची निखळ मैत्री

  1. सुंदर… या छोट्यांच्या मोठ्या जगात डोकवायलाच हवे 🙂

Leave a Reply