Adi's Journal

Pieces of my thourhgs

मेनका

प्रचंड उकाड्याची एक ढगाळ संध्याकाळ. उन्हाळ्यातलीच, पण मळभ दाटून आलाय. विनय एकटाच आपल्या खोलीत अंधारातच बसला होता. टेबलवर तासाभरापूर्वी वाफाळता असलेला चहाचा कप आता थंडपणे भरलेला. बाजूला अॅश ट्रेच्या खाचेत बऱ्याच वेळात त्याच्या ओठापर्यंत न पोचलेली सिगारेट जळत जळत फिल्टर पर्यंत पोहोचली होती. तंद्री लागल्यासारखा तो त्या धुराच्या उठणाऱ्या वलायांकडे पाहत होता. समोर टेबलावरच त्याचं रायटिंगपॅड पानं फडफडवत होतं. त्यावर लिहिलेल्या चार शब्दांपलीकडे त्याला काहीही सुचत नव्हतं म्हणा किंवा खूप काही मनात होतं पण ते विचार कागदावर येईपर्यंत मन त्यांचा हात पकडून कुठे तरी लांब पोहोचत होतं. आणि न प्यायलेल्या सिगारेटच्या धुरात विनय त्या विचारांच्या मागे कुठेसा हरवला होता.

अजून वेळ आहे म्हणता म्हणता लेखाची डेडलाईन परवावर येऊन ठेपली होती. गेले दोन वर्ष एका आघाडीच्या दैनिकासाठी तो दर आठवड्याला एक सदर लिहितोय. “तुला हवं ते लिही” अशी पूर्ण मोकळीक त्याला संपादकांनी दिलेली होतीच. आणि गेल्या दोन वर्षात आजूबाजूला इतकं काही घडत होतं की त्याला काय लिहू आणि काय नको असं व्हायचं. खरं तर खूप घडामोडी गेल्या आठवड्यातही घडल्या होत्या. ज्याच्यावर त्याला लिहायचं होतं. डोक्यात एका वेळी चार-चार लेखांचे आराखडे तयार होते. पण मनातूनच तो कुठे तरी हलला होता. खूप खूप बोलायचं होतं पण रोज दिमतीला उभे असणारे शब्द आज कुठेसे दूर निघून गेले होते.

आयुष्य एकट्यानी जगण्याचा निर्धार केलेला विनय गेले दोन दिवस स्वतःशीच भांडत होता. केलेला निर्धार पर्वतासारखा पक्का होता. पण का? का यावं तिनी माझ्यासमोर? माझ्यासारख्या विश्वामित्रासमोर मेनकेनी यायलाच हवं का? हे असले प्रश्न घेऊन स्वतःशीच वादंग चालू होता. चार दिवसांपूर्वी त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्याची सही घेण्यासाठी रांग लागली होती. येणाऱ्या प्रत्येकाला त्याचं नाव विचारून त्याच्यासाठी खास असं एखादं वाक्य लिहून विनय सही करत होता. एकेकजण येत होता आणि जात होता. कित्येक वेळा तर विनयची मानसुद्धा वर होत नव्हती तर पुढचे पुस्तक समोर सरकवले जायचे. पण पुस्तक समोर यायच्या ऐवजी अचानक “हाय, कसा आहेस?” हे शब्द कानावर पडले आणि विनय नी मान उचलली आणि विनयची नजर एका सुंदर नाजूक आखीव चेहेर्‍यावर स्थिरावली. स्थिरावली कसली खिळलीच म्हणा न.

“हेल्लो, कसा आहेस? ओळखलं नसशीलच.” या वाक्यानी विनय भानावर आला, आणि थोडा ओशाळला देखील. “सुधा दातार, १५ वर्षांनी भेटतोय, त्यामुळे ओळखणार नाहीस हे मान्य आहे. पटकन सही दे. मागेही लोकं रांगेत आहेत. मी थांबतेय, नंतर बोलू” विनय नी तिच्या चेहेऱ्यावरून नजर न ढळू देता पुस्तक घेतलं आणि आपसूकच ‘to Sudha, with love ♥.’ असं लिहून त्याची विशेष फार्राटेदार सही ठोकून पुस्तक तिच्या समोर धरले. बाकी लोकांसाठीच्या सह्या साहजिकच यांत्रिक पद्धतीत झाल्या. रांग संपेपर्यंत मधून मधून त्याची नजर सुधाला शोधत होती. ती आपली दुकानातली इतर पुस्तक बघता बघता मधूनच रांगेवरही नजर टाकत होती. नजर भिडलीच तर एक हास्य पसरत होतं, छोटंसं. सुधा, त्याची वर्ग मैत्रीण. छे छे फार तर सहाध्यायी म्हणू. तेव्हा विशेष मैत्री नाही त्यामुळे शाळेनंतर संपर्कात राहण्याचही काही कारण नव्हतं.

पण सुधाच्या ह्या अवतारानी विनयची विकेट पडली होती. कुठे दोन चप्प वेण्या आणि ढगळ युनिफॉर्म घालुन शाळेत येणारी सुधा आणि आजची बॉब केलेले केस मानेच्या झटक्यानी मागे सरकावणारी जीन्स टी-शर्टमधली सुधा. विनयची कानशीलं तापली होती. काळीज उगाचच जोरात धडधडत होतं. पुढची रांग संपायला लागलेला अर्धा तास पण त्याला २-३ तासांसारखा वाटला. शेवटी एकदाची रांग संपली आणि विनयनी पेन बंद केलं. आणि कसबसं प्रकाशकाला लवकर कटवून ओढल्यासारखा सुधाकडे गेला. तो तिच्यासमोर पोहोचेपर्यंत दोघंही एकमेकांना फक्त पार तोंडभर स्माईल देत होते. विनय तर इतका एक्साईट होता की तोंडातून शब्दच फुटत नव्हते. पुन्हा एकदा त्याच्या कानावर तिचा मधाळ आवाज आला, “कसा आहेस?” “टकाटक” विनय बत्तीशी दाखवतच उत्तरला. “आजीबात बदलला नाहीयेस १५ वर्षात. अजूनही तसाच राहतोस, झिपऱ्या.” असं म्हणत सुधा मनमोकळी हसली. “पण तू नाव सांगितलं नसतं न तर मी आजीबात तुला ओळखलं नसतं. तुझातर टोटल मेकओव्हर आहे. चल बाजूच्या कॅफे मध्ये जाऊ.”

पुढचे दोन अडीच तास १५ वर्षातले निसटलेले क्षण शोधण्यात गेले. आणि इंग्लीश लिटरेचर मध्ये BA Honers केलेल्या बहुश्रुता सुधावर फिदा होऊन लेखक महाशय तरंगत तरंगतच घरी पोचले. सवयीनुसार, पंखा आणि लॅपटॉप एकदमच सुरु झालं आणि लगेचच, फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट झळकली. अर्थातच सुधा दातार. मोबाईल नंबरची देवाण घेवाण कॉफीबरोबरच झाली होती. त्यामुळे सारी संध्याकाळ कायअप्पावर गप्पा करण्यात गेली. आणि त्या रात्री गादीला पाठ लावल्यापासून ते आज संध्याकाळपर्यंत मनात हेच द्वंद्व चालू होतं. कासोशिनी पळालेल्या निश्चयावर ठाम राहायचं की हृदयाच्या हाकेला ओ द्यायची. तिच्यासाठी माझ्यासारख्या चहाच्या निस्सीम उपासकानी कॉफीला का जवळ केलं? एक न अनेक प्रश्न त्याला भंडावून सोडत होते. सुधानी तर मनात मुक्कामच केला होता. जाम तिथून हलायला तयार नव्हती. एकीकडे हे द्वंद्व आणि दुसरीकडे कायअप्पावर गप्पा.

अचानक मोबाईलचा गजर वाजला आणि विनयची तंद्री मोडली. आणि इतका वेळ द्वंद्वात अडकलेल्या विनयला ओढ जाणवायला लागली. विचार पक्का झाला. भराभर फ्रेश होऊन छानसा टी-शर्ट अंगावर चढवून टेबलवरच्या ब्रूटचे दोन फवारे त्यानी मानेवर मारले. केसातून हात फिरवून आपल्याशीच हसला. आपल्या मागे दार ओढून घेत बाहेर पडला, त्यांच्या दुसर्‍या कॉफी-डेटसाठी.

Image courtesy : Play buzz

Related Posts

3 thoughts on “मेनका

Leave a Reply