तात्या

तात्या, परखड रोखठोक पण काळजाच्या जवळच्या गोष्टी निघाल्या की तितकाच हळवा होणारा. आपले अंतरंग काहीही हातचे नं राखता आपल्या लिखाणातून मांडणारा. वास्तविक तात्याला कधीच प्रत्यक्षात भेटायचा योग आला नाही. फेसबुकावर ओळख झाली तीच मुळात एका उत्तम लेखामुळे. त्या क्षणापासून असा एकाही लेख तात्यानी लिहिला नसेल जो मी वाचला नाहीये. (जुने लेख सोडून द्या तात्या…). माझ्या भावविश्वात आढळ कोपरा निर्माण केलाय तात्या.

आज स्पष्ट कबुल करतो; मला तात्याचा हेवा वाटतो. आपण जळतो साला त्याच्या नशिबावर. जळतो त्याच्या मोजक्या शब्दात व्यक्तिचित्र उभा करायच्या हातोटीवर (थोड्या क्लुप्त्या मला पण सांगा की तात्या). जळतो त्याला लाभलेल्या थोरामोठ्यांच्या सहवासाबद्दल, त्यांच्याकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल, आशिर्वादाबद्दल वाचतो तेव्हा तर पार जाळून कोळसाच होतो.

तात्या, एकच मागणं आहे. हात मस्तकी ठेवून आशीर्वाद द्यावा. दिग्गजांच्या पायी मस्तक ठेवल्याचं समाधान मिळेल. पु लंनी रावसाहेब आत्ता लिहिलं असतं तर मी नक्की म्हटला असतं रावसाहेब म्हणजे आपणच. “शौक करायच्या जागी शौक करायचा. उघड करायचा. शिवराळ बोलना पण कधीही अश्लील किंवा अश्लाघ्य नं वाटणारे.” त्या भाषेशिवाय तात्या अभ्यंकर मनाला मान्यच होत नाही.

तात्या.. असेच लिहिते राहा. बस आता लवकर दर्शनाचा योग येऊ दे.

Continue Reading

मानसी तू लिहितेस पण?

मानसी, कधीही वाटलं नव्हतं आपण भेटू, आणि एक दृढ मैत्री, एक भावा-बहिणीचं घट्ट नातं विणले जाईल. कधी भेटलो कसे भेटलो हा भाग आपल्यासाठीच ठेवू. वास्तविक तू छान गातेस, भरपूर वाचतेस इतकं माहित होतं. पण मला आत्ता सांगायची आहे ती आठवण खूप वेगळी आहे. मला अजून आठवतो तो तू लिहिलेला सुरेश भटांवरचा लेख. अगदी त्या क्षणापर्यंत मला माहित नव्हतं तू इतकं छान लिहितेस सुद्धा. आपल्या कॉलेजच वार्षिक प्रकाशित करायचं होतं. मी त्या वर्षीसाठी संपादक होतो. अगदी उत्साहात तू काही लिहून देऊ का म्हणून विचारलस.
दोनच दिवसात दोन फुलस्केप पाने माझ्या हातात ठेऊन तू मोकळी झालीस. हातात पडेल ते वाचायला लागणारा मी त्या वेळी मात्र दोन मिनिट त्या कागदांकडे बघत राहिलो; तुझं सुटसुटीत अन् सुंदर अक्षर बघून. तुझं लेख वाचून भटांशी माझी जास्त ओळख झाली. नाही तर मला फक्त “लाभले आम्हास भाग्य” आणि “रंग माझं वेगळा” इतकेच भट माहिती होते. नंतर कुठे काय माशी शिंकली देव जाणे. प्रकाशनाचे काम थांबले अन् पुढे बारगळलेच.
आज आठवण झाली त्याचं कारण म्हणजे “रंगुनी रंगात साऱ्या” च. खूप दिवसांनी गाणं कानावर पडलं आणि भूतकाळाचा पडदा हलला. पुन्हा दोन मिनिट तुझं टपोर अक्षर बघत थांबून मग लेख वाचायची इच्छा झाली. अजूनही जपून ठेवलाय लेख पण नेमका नाशिकला घरी आहे. का बंद केलंस लिहिणं? तुला पुन्हा लिहीतं झालेलं पहायचं आहे.

Continue Reading

धावपळ पडद्यामागची

स्नेहसंमेलन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो जल्लोष, उत्साह, बेभान होऊन काम करणारे हौशी कलाकार आणि बऱ्याचदा त्यांची टर उडवणारे प्रेक्षक. काय वाटेल ते करतात काय विचारू नका. खुर्च्यांवर उभे राहून जा जा असे हातवारे करणं, ग्रुप मध्ये उठून कवायती करणं. एकाच वेळी सगळ्यांनी मागेच काय बघायला लागणं. काही विचारू नका. या सगळ्या गोंधळात खरा कस लागतो तो पडद्यामागील कलाकारांचा. अन् त्यातही सगळ्या सादरीकरणांना सांधून एकसंध कार्यक्रम देणाऱ्या निवेदकांचा.
अभियांत्रिकीतील स्नेहसंमेल खास वाटतं ते याच धावपळीसाठी. वास्तविक माझं पहिलच. त्या अगोदर रंगमंचावर उभं राहिलेलो ते पहिली दुसरीत असेन. प्रत्येकाला वेळ दिलेला असून पडद्यामागे प्रचंड गोंधळ. अभियांत्रिकी करणारे तसे सगळे कलाकारच. परीक्षा पास होण्याकरता अनेक कला दाखवतात. पण स्टेज वर जायची पाळी आली की कुठे दडून बसतात देव जाणे. ५० वेळा ओरडल्यावर उगवणार. तर काही जण सारखं येऊन आम्ही कधी स्टेजवर जाणार असा विचारात बसणार. कोणाला वेळा बदलून हव्या असतात. एक ना अनेक गोष्टी.
या सगळ्या आघाड्यांवर तोंड देत बाजीप्रभू सारखी लढणारी सुप्रिया आजही डोळ्यासमोर आहे. कार्यक्रमात बदल झाले की त्यासाठी त्या त्या निवेदकांचा शोध. ते तरी कसले स्टेज मागे थांबणार? धुडगूस घालायची संधी कोणी सोडणारे होय. एखादा सापडलाच नाही तर आयत्या वेळी कोणाला स्टेजवर ढकलायचा, कोणाला कधी थांबवायचा. या सगळ्याची नोंद करत करत हातातला मूळ क्रम लावलेला कागद पार कला पडलेला.
प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आयत्यावेळी उभी केलेली मामाची मामी मात्र या सगळ्या धावपळीचा कळस होता. मामा त्या वर्षीचा स्टार होता. मामा ही काय वल्ली होती ती पुढे कधीतरी सविस्तर सांगीनच. पण या मामाला हुडकला तो सुप्रियानीच. पण त्याचं काम बघायला काही तिला बघायला मिळालं नाही. खायची प्यायची शुद्ध नसलेल्या सुप्रिया दिवसाखेरी सुटकेचा निश्वास टाकायची.
कार्यक्रम संपला तरी आमची अख्खी टीम चहा पीत गप्पा ठोकत बसायची. या मॅडम तिथे असायच्या, हसायच्या देखील पण मनात चाललेलं उद्याच नियोजन न त्याच येणारं थोडसं टेन्शन तिच्या त्या हसण्यातून पण डोकवायचं. जणू काही एखादा बाळंतपण केलं असं समाधान तिच्या चेहेऱ्यावर शेवटच्या दिवशी होतं. एका अर्थी हे बाळंतपणच होतं मामाच्या भूमिकेचं, आयत्यावेळी शोधलेल्या मामीचं, माझ्यातल्या निवेदकाचं.
कॉलेज संपल तशी सगळ्यांची पांगापांग झाली. पण मनात या आठवणी तशाच घर करून होत्या; आहेत. सुप्रिया पण अमेरिकेत पुढे शिकतेय. पुढची वाटचाल पण ती त्याच जिद्दीनी आणि आत्मविश्वासानी नक्की करेल यात शंका नाही. खूप शुभेच्छा.

Continue Reading

नीरज – मनाच्या कोपऱ्यातला

IMG_7042कुठल्या आठवणी कधी जाग्या होतील सांगता येत नाही. वास्तविक शाळेच्या दिवसातल्या लक्षावधी आठवणी मनात दाटून आल्या पण मन स्थिरावलं ते शनिवार वर. शनिवारी आम्हा मित्रांचं ठरलेलं काम. नीरजला जाऊन शाळेत जाण्यासाठी उठवायचं. त्या ६ वर्षांत नीरज शनिवारी आपणहून आधी उठल्याच मला आठवत नाही. आम्ही सगळे मित्र त्यासाठी जास्त लवकर उठायचो. आवरून सावरून सायकली पिटाळत त्याच्या घरी हजर.
वर जाऊन महाराजांना उठवायचं. त्याचा आवारे पर्यंत आम्ही सगळे मित्र खुर्च्यांमध्ये पेंगत उरलेली झोप वसूल करायचो. मग काकूंनी दिलेलं गरम गरम दुध पिऊन आमची टोळी बाहेर पडायची. सुरवातीची वर्ष बस नी अन नंतर सायकलींवर. शाळेत जाण्याच्या अनेक आठवणींची रंगच या नंतर मनात आली.
अजूनही आठवतात ते उंच काका. ते बस थांब्यावर दिसले की आमची टोळी खुश. आमच्या घरून शाळेपर्यंत जायला रिक्षाला ३ रुपये पडायचे न बस ला १ रुपया. आम्हा ६ लोकांना उंच काका त्यांच्या रिक्षातून फक्त १ रुपयात थेट शाळेपर्यंत सोडायचे. पुढे ८-९ वी मध्ये सायकल हातात आली आणि उंच काकांची रिक्षा शाळेच्या प्रवासातून बाद झाली.
१० वी मध्ये तर सगळीकडे सायकल वाऱ्या. पाहते ६ पासूनच क्लास असायचे. घमंडी मॅडम चा संस्कृत क्लास म्हणजे घरचीच शिकवणी असल्यासारखी असायची. क्लास नंतर तिथेच डबा खाण, गच्चीत फुटबॉल खेळणं, काय विचारू नका. नंतरचे इंग्लिश गणिताचे क्लास मात्र क्लास सारखेच व्हायचे. मग दिवसभराची शाळा उरकून घरी पोचायला संध्याकाळचे ६ वाजणार. १० वी संपली आणि सगळ्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. तरी भेटी गाठी अजूनही चालूच आहेत. पण नीरज नी खूपच वेगळी वाट धरली. कधीही परत न भेटण्याची. सोबत देऊन गेला त्या या सगळ्या हृद्य आठवणी कायम बरोबर बाळगण्यासाठी.

Continue Reading

बऱ्याच वर्षांनंतर

खूप वर्षानंतर अचानक फेसबुक वर पुन्हा भेट व्हावी आणि मैत्रीचे नाते पुनश्च बहारावे असा अनुभव खूप लोकांना आला असेल. माझ्यासाठी हा अनुभव खूप खास. तशी आमची ओळख प्राथमिक शाळेतली. मध्यंतरीच्या काळात पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. अर्थात साहजिकच आहे म्हणा, १५ वर्षांनी पुन्हा बोलणं होत होतं. बऱ्याच वर्षांच्या साचलेल्या आठवणींना पाझर फुटला आणि मनाचे धागे जुळत गेले.

रोज गप्पा होऊ लागल्या, नेटवर, मोबाईलवर. १५ वर्षांचे अंतर दिवसांमध्ये कापले गेले आणि कधीही दुरावले नसल्यासारखे घट्ट नाते निर्माण झाले. आता गावी जाणे झाले की कोणी भेटो न भेटो ही एक भेट निश्चित असते. आणि भेटल्यावर घड्याळाला फाटा असतो. तेजू, आज कोणाचाही विश्वास बसणार नाही कि आपण एकमेकांना १५ वर्षानंतर परत भेटलोय. प्राथमिक शाळेत कसे दिसायचो हे देखील आता आठवत नाही. आठवतात ती फक्त नावं आणि शाळेतली धमाल.

दोघेही दिवसभर कामात गुंतलो तरी ख्याली खुशाली घेतल्याशिवाय चैन नं पडणारे आपण, काही निरोप नाही आला तर सारखे फोने उघडून बघतो नाही का? दिवसभराची रोजनिशी वाचण्याच्या गप्पा आपण कधी मारल्याच नाहीत. रेल्वे रूळ बदलणार नाही इतक्या सटासट आपल्या गप्पांचे विषय बदलतात. विषयाचे बंधन नसलेल्या गप्पा रंगतात त्या फक्त तुझ्याबरोबर. या रंगलेल्या गप्पा निश्चितच आपल्या अंतापर्यंत अशाच चालू राहतील…

Continue Reading

कॅलीडोस्कोपच्या निमित्तानी

मित्रांनो, कोणाकोणाशी गप्पा मारताना कुठले विषय मनात काय तरंग निर्माण करतील याचा अंदाज कधीच लागत नाही. मागे असाच गप्पा मारत असताना कॅलीडोस्कोपच्या पहिल्या भागाचा धागा सापडला आणि मी लिहिता झालो. त्याबद्दलच दोन दिवसांनी आम्ही परत बोलत होतो तेव्हा पुढील काही धागे सापडत गेले आणि कॅलीडोस्कोपचा दुसरा भाग तुमच्यासमोर मांडला. पहिले दोन भाग झाले ते केवळ कल्पनेच्या बळावर.
कॅलीडोस्कोपच्या नक्षी प्रमाणेच असलेल्या आठवणी वारंवार मनावर उमटत जातात. आयुष्यात आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या आठवणी. त्या तुमच्यासमोर मांडायची कल्पना यातूनच पुढे आली. कॅलीडोस्कोप मालिका स्वरुपात तुमच्यासमोर येण्यासाठी कारणीभूत आहेत त्या साऱ्या मित्रांना आभार मानून त्यांच्या मैत्रीचा अपमान मला करायचा नाही. पण त्यांच्या आयुष्यात असण्यानी मनाला होणारा आनंद खूप मोठा आहे इतकच आत्ता मी सांगीन.
आठवणींचा हा गोफ कुठला रंग घेऊन कधी येईल सांगता येत नाही. व्यक्तिचित्र नी म्हणता येणार. लिहीन त्या आठवणी. छोट्याश्या. मनात येतील तशा, येतील तेव्हाच्या. कॅलीडोस्कोपच्या नक्षीसारख्याच…

Continue Reading